राज्याच्या एकूण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे, म्हणूनच नाशिक जिल्ह्याला विशेषता मोसम खोरे म्हणून ओळखला जाणारा कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थातच कसमादे पट्टा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असते. या खरीप हंगामात परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांची मोठी नासाडी झाली होती, कांदा पिकाचे देखील यामुळे उत्पादन घटल्याचे नमूद करण्यात आले.
आता परिसरातील शेतकरी उन्हाळी कांदा बियाणे तयार करण्यासाठी लगबग करत आहे, त्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याची निवड करून त्या कांद्याला कापून शेतात लावले गेले आहे, या लावल्या गेलेल्या कांद्याला परिसरातील शेतकरी ढोले म्हणून संबोधत असतात. मात्र सध्या या ढोल्यावर बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. त्याच्यावर दाट धुक्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे. यामुळे कांद्याच्या बीजोत्पादनातकधी नव्हे ती घट होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. कसमादे पट्ट्यातील विशेषता देवळा तालुक्यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक कांदा उत्पादक शेतकरी स्वतः कांदा बियाणे तयार करत असतात. या परिसरातील शेतकरी कांद्याच्या तिन्ही हंगामासाठी म्हणजे खरीप हंगामातील लाल कांदा, लेट खरीपचा रांगडा कांदा, आणि रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा पिकासाठी घरगुती बियाणे वापरत असतात. या हंगामात देखील चांगल्या दर्जाची कांदा निवड करून त्यांचे कंद लागवड केली गेली आहे. या लावल्या गेलेल्या कंदाना आता बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिले आहे, ढगाळ वातावरणामुळे तसेच दाट धुक्याच्या चादरीमुळे कांद्याच्या बीजोत्पादनासाठी केलेली लागवड प्रभावित झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या मात्र त्याचा कुठलाही फायदा होतांना नजरेस पडत नाही. बीजोत्पादनासाठी लावल्या गेलेल्या कांद्याची म्हणजेच ढोल्याची पात गोंडे अर्थात ढोले येण्यापूर्वीच करपून जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे डेंगळे नांगरून टाकले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा नव्याने कांदा बीजोत्पादन तयार करण्यासाठी लागवड करत आहेत. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांजवळचा उन्हाळी कांदा पूर्ण विकला गेला आहे तर काही कांदा सडला आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर चांगल्या दर्जाचा उन्हाळी कांदा विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचा उन्हाळी कांदा बीजोत्पादनासाठी भेटत नसल्याने या हंगामात कांद्याच्या बिजोत्पादनात घट घडून येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या हंगामात लावला गेलेला कांदा सतत पडत असलेल्या दाट धुक्यामुळे संकटात सापडला आहे तर आगामी हंगामासाठी बीजोत्पादन कमी झाले असल्याने बियाण्याचे दर हे आसमान गाठतील आणि परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होईल.
Share your comments