Onion Bajarbhav : राज्यात सध्या कांद्याचे दर नरमलेले पाहायला मिळत आहेत. आज (दि,२७) रोजी राज्यात कांद्याला १ हजार ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. राज्यभरात आज कांद्याची १ लाख ५८ हजार ६९८ क्विंटल आवक झाली आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता जास्तीच्या कालावधीची नसल्याने बाजारात आता कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. तसंच खरीपाचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासत असते. यामुळे शेतकरी शेतमाल बाजार विक्रीसाठी नेत आहेत.
आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ७५ हजार ८६२ क्विंटल आवक झाली आहे. या कांद्याला कमीत कमी ५०८ रुपये तर जास्तीत जास्त १ हजार ९९७ रुपये तर सरासरीचा दर १ हजार ६४५ रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला आहे. तर नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात २८ हजार १८४ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला कमीत कमी १५० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार २०० रुपये तर सरासरी १ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडणचीत आले. परंतु काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. मात्र निर्यातीवर अद्यापही शुल्क लावण्यात आलेले तसेच आहे. यामुळे निर्यातदारांना निर्यातीत अडचण निर्माण झाली आहे. कांद्याला दर नसल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नाराज आहेत. त्यात उन्हाळ कांदा देखील बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.
Share your comments