राज्यात सर्वत्र खरीप हंगामात लाल कांदा रब्बी हंगामात रांगडा कांदा उन्हाळी हंगामात उन्हाळी कांदा लागवड केली जाते. नाशिक जिल्हा कांद्याच्या उत्पादनात राज्यातच नव्हे तर देशात देखील अग्रस्थानी विराजमान आहे. नाशिक जिल्हा यामुळेच कांद्याचे आगार म्हणून संपूर्ण देशात विख्यात आहे. असे असले तरी, खरिपातील लाल व रब्बी हंगामातील रांगडा कांदा लागवडीसाठी जिल्ह्यातील चांदवड व येवला हे दोन तालुके विशेष ओळखले जातात. या दोन तालुक्यात लाल व रांगडा कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. गेल्या तीन-चार वर्षांपासून या दोन्ही तालुक्यात लाल व रांगडा कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे, तीन-चार वर्षापासून कांद्याला समाधान कारक बाजार भाव प्राप्त होत असल्याने या तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीकडे आकृष्ट झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
यावर्षी या तालुक्याने खरिपातील लाल व रब्बी हंगामातील रांगडा तसेच उन्हाळी हंगामातील उन्हाळी कांदा लागवडीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाल रांगडा व उन्हाळी या तिन्ही हंगामाच्या कांद्याची 45 हजार हेक्टरवर लागवड करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तालुक्यात नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती नजरेला पडत असे तरी देखील अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत शेतीला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कार्यरत असतात. यावर्षी तर या तालुक्यात वरुणराजा विशेष मेहेरबान राहिला आहे त्यामुळे कधी नव्हे तो विक्रमी पाऊस या तालुक्यात नजरेस पडत आहे. म्हणूनच या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. तसं बघायला गेलं तर कांदा एक नगदी पीक आहे मात्र शेतकरी बांधव त्याला नेहमी बेभरवशाचे पीक म्हणून संबोधत असतात. असे असले तरी कांद्याचे पीक या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच एक वरदान सिद्ध होत आले आहे. कांदा पिकाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना एक नवीन संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.
मागील 40 वर्षांपासून या दोन्ही तालुक्यात कांदा पीक मुख्य पीक म्हणून ओळखले जात आहे, कांदा पिकाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले आहे. बदलत्या काळानुसार येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत मोठा बदल केला व सोयाबीन, द्राक्षे, पपई, कपाशी नव्हे नव्हे तर कॉफीची देखील लागवड केली. मात्र असे असले तरी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा वरील प्रेम काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आता तर गेल्या चार वर्षापासून कांद्याला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होताना दिसत आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कांदा लागवडीलाच विशेष प्राधान्य दिल्याचे समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की 4 वर्षांपूर्वी या तालुक्यात अवघ्या तीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जात असे, मात्र गत चार वर्षापासून मिळत असलेल्या समाधानकारक बाजार भावामुळे या तालुक्यात लाल, रांगडा आणि उन्हाळी मिळून कांद्याचे क्षेत्र 45 हजार हेक्टर वर येऊन ठेपले आहे. चालू हंगामात येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी खतांची कमतरता, तर कधी मजूर टंचाई या सर्व समस्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा लागवड करताना नाकी नऊ आले होते.
मात्र प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास माहरत प्राप्त असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालू हंगामातील प्रतिकूल परिस्थितीला देखील न जुमानता विक्रमी कांदा लागवड केली आहे. तालुक्यातील अनेक भागात अद्यापही उन्हाळी लागवडीचे कार्य प्रगतीपथावर असल्याचे समजत आहे. सध्या कांद्याला 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त होत आहे त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात कांद्याच्या दरात सातत्य राहण्याची आशा आहे व त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरून निघेल अशी देखील आशा आहे.
Share your comments