राज्यात चहुकडे कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो, असे असले तरी नाशिक जिल्ह्यात कांदा हा सर्वात जास्त पिकवला जातो. नाशिक जिल्ह्याला विशेषता कळवण सटाणा मालेगाव देवळा म्हणजे कसमादे आणि चांदवड व येवला तालुक्यात कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेली आहे. चांदवड आणि येवला या दोनच तालुक्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड या हंगामात नजरेस पडत आहे.
रब्बी हंगामातील कांदा तसेच अन्य पिकांच्या जोमदार वाढीसाठी मोठ्या प्रमाणात खतांची मात्रा पिकांना द्यावी लागते, मात्र जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या वेळी खतांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. मात्र जिल्ह्यात असलेली रासायनिक खतांची टंचाई ही खरीखुरी टंचाई नसून कृत्रिम पद्धतीने काही पैशांच्या हव्यासापोटी बळीराजाचा घोट घेण्यासाठी केली गेलेली टंचाई असल्याचा दावा जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मते, खरेदी विक्री संघ सोसायट्यांमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याने, शेतकरी बांधव वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र कृषी सेवा केंद्रावर रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांकडून अधिकचा पैसा ओरमाडला जात आहे, तसेच जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांना ज्या खताची आवश्यकता नसते त्या खतांची देखील खरेदी करण्यासाठी बळजबरी केली जात आहे नाही तर शेतकऱ्यांना आवश्यक खत देण्यास दुकानदारांकडून मनाई करण्यात येत आहे. रासायनिक खतांच्या टंचाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला लागला असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना यांच्यावतीने नाशिकात विभागीय अधीक्षक सुनील वानखेडे यांना यावेळी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन विभागाचे अधीक्षक यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राचे कांदा उत्पादक संघटनेने वेळेत जिल्ह्यात चालू असलेली ही कृत्रिम खत टंचाई दूर न केल्यास विभागीय कृषी कार्यालयाला घेराव घालण्याचा रोखठोक इशारा देखील यावेळी दिला. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या या निवेदनानंतर जिल्ह्यातील ही खत टंचाई दूर होते की नाही हे बघण्यासारखे असेल.
Share your comments