कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यानं केलं मुंडन आंदोलन
१. यंदा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे बाजारात कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यात अवकाळी पावसात कांदा पीक सापडल्याने सडू लागला आहे. बाजारात कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरीदेखील संतप्त झाले आहेत. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर एका शेतकऱ्याच्या कांद्याला १ रुपये ५ पैशांचा भाव मिळाला होता.
त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बाजार समितीसमोरच कांद्याचा अंत्यविधी केला. गणेश सीताराम गणगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानंतर या शेतकऱ्याने शुक्रवारी बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच दहा ते बारा शेतकऱ्यांनी मुंडण करून कांद्याचा दहाव्याचा विधी केला. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली.
'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा लाभ मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार, बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक
२. 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेचा लाभ मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची e -KYC बाकी असेल त्यांनी तात्काळ करून घ्यावी. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षात ३ हप्त्यांत ६,००० रुपये मिळणार आहेत.
तसेच केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. मात्र यासाठी बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील. केंद्र सरकारचा १४ वा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा १ ला हप्ता मे अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार
३. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याचं बोललं जातंय.
यामध्ये फार्मर प्रोडूसर कंपनीला ऊसापासून इथेनाॅल निर्मितीचे परवाने मिळावेत, काजूला हमी भाव मिळावा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच कोकणातील बारसू येथिल प्रस्ताविका रिफायनरी प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये भागीदार करुन द्यावे. तसेच सरपंचच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने सकारात्मक विचार करावा, अशा मागण्यांसाठी हा धडक मोर्चा निघणार आहे.
शेतकऱ्याला रब्बी व खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सरकारने प्रती एकर 10 हजार रुपये द्यावे, मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची मागणी
४. शेतकऱ्याला रब्बी व खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सरकारने प्रती एकर 10 हजार रुपये द्यावे अशी मागणी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी केली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला. आणि या सर्वेक्षणातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष समोर आला आहे.
त्यांनी पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे केला होता. आता हा अहवाल ते सरकारला देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणालेत. आता या शिफारसीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
५. आता एक महत्वाची बातमी
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली होती. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अकोल्यात पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी जागरणच्या चौपाल येथे प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे मुत्सद्दी एंजेलो डी क्विरोज मौरिसियो आणि फ्रैंक मार्सियो डी ओलिवेरा उपस्थित
६. कृषी जागरणच्या चौपाल येथे प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे मुत्सद्दी एंजेलो डी क्विरोज मौरिसियो आणि फ्रैंक मार्सियो डी ओलिवेरा उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड आणि नवकल्पनांवर त्यांनी यावेळी सखोल चर्चा केली. या कार्यक्रमात कृषी जागरणचे संस्थापक इतर प्रमुख सदस्य आणि कृषी पत्रकार देखील उपस्थित होता.
( visual credit - भाऊसाहेब शेळके पाटिल -Facebook/ sadabhau khot -Facebook )
अधिक बातम्या:
College of Veterinary Medicine : या ठिकाणी नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय होणार; राज्य सरकारचा निर्णय
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा
Share your comments