Onion News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी संसदेत कांदा निर्यातबंदीवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. सरकराने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतं आहे. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे जवळपास २ हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्या हल्ला, रात्रपाळी लाईट अशा मुद्द्यांवरुन खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाना साधला आहे.
संसदेत राष्ट्रपतीचे भाषण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी भाषण केलं आहे. यावेळी कोल्हेंनी भाषणात जुन्नर येथील बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी आणि गुराख्यांचा प्रश्न मांडला. रात्र पाळीत लाईट मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मिडल ईस्ट मार्केट, युरोपचे मार्केट पाकिस्तानच्या कांदा शेतकऱ्याने काबिज केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे चांगले झाले असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
कांदा निर्यातबंदीबाबत कोल्हेंनी सोशल मिडीयावर ट्विट करुन सरकारला सवाल देखील केला आहे. कोल्हेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "पाकिस्तानी शेतकऱ्याचे कैवारी कोण? माझा बळीराजा काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो, चोरी-चपाटी, लबाडी त्याला जमत नाही. बळीराजाच्या या भाबडेपणाचा गैरफायदा घेत भाजपने त्यांना फसवलं, आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू म्हणत त्यांची मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर काय केलं?
सत्तेत आल्यानंतर काहीही विचार न करता कांदा निर्यात बंद करून भाजपने माझ्या बळीराजाला रस्त्यावर आणलं. माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहे. याचा जाब सरकारला विचारणं हे एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझं कर्तव्य आहे!"
Share your comments