राज्यात कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते, नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो, एवढेच नाही तर नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधले जाते. हेच कारण आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अर्थात लासलगाव कांदा मार्केट देखील नाशिक जिल्ह्यातच आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात अर्थात कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
सध्या जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी मजुर मिळेना अशी परिस्थिती झाली आहे, मजुराची टंचाई भासत असल्याने कांद्याचे उत्पादन घेणारे शेतकरी पूर्णतः संकटात सापडताना दिसत आहे, कसमादे प्रांतातील अनेक शेतकरी हे केवळ कांदा पिकावर अवलंबून असतात, त्यामुळे जिल्ह्यात विशेषता कसमादे प्रांतात कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीसाठी अधिकची मजुरी देताना दिसत आहे, असे असून देखील कांदा लागवडीसाठी मजुर मिळत नाहीये.
या ठिकाणी झाली रात्रीची कांदा लागवड
कसमादे भागात अनेक ठिकाणी खरेदीच्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, आणि रब्बी हंगामातील रांगडा कांदा लागवडीसाठी लगबग सुरू आहे. मात्र या रांगड्या कांद्याला वावरात उभे करण्यासाठी मजूरच उभे राहत नाहीये. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मजुरांना पंचवीस रुपये वाफे या दराने मजुरी दिली आहे मात्र असे असून सुद्धा मजूर भेटत नाहीये. वातावरणात होत असलेल्या नेहमीच्या बदलामुळे कांद्याच्या रोपवाटिका खराब होण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे, त्यामुळे शेतकरी बांधव लवकरच कामाला गोड करण्याच्या विचारात आहे, सर्वत्र एकाच वेळी कांदा लागवडीची लगबग असल्यामुळे मजुरांची टंचाई भासत असल्याचे जाणकार सांगत आहेत. मजुराची याचं टंचाईमुळे बागलाण तालुक्यातील नवीन शेमळी या गावात रात्रीची कांदा लागवड बघायला मिळाली आणि रात्रीची ही कांदा लागवड परिसरात एक चर्चेचा विषय ठरत आहे. शेमळी गावातील कांदा उत्पादक शेतकरी लक्ष्मण वाघ यांनी आपल्या वावरात रात्रीची कांदा लागवड केली.
शेतकऱ्यांचे कुटुंबच बनत आहे मजूर
कांद्याच्या रोपांना वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी आपल्या परिवारातील सदस्य व आजूबाजूचे शेतकरी यांची पडजी घेऊन कांदा लागवड करत आहेत, तसेच काही शेतकऱ्यांना एकरी 11 हजार रुपये पर्यंत मजुरांना मजुरी द्यावी लागत आहे, शिवाय मजुरांना शेतात आणण्यासाठी व परत घरी सोडण्यासाठी येत असलेल्या वाहतूक खर्च हा अधिकचा लागत आहे. एकंदरीत परिस्थिती बघता कांदा लागवडीसाठी येणारा खर्च हा अनपेक्षितपणे वाढणार असे चित्र दिसत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात थोडी का होईना घट होईल असे जाणकार सांगत आहेत.
Share your comments