रेशन दुकान आणि सर्वसामान्य जनता यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. आपल्याला माहितआहेच की, स्वस्त धान्य रेशन दुकानांवर मिळते. काही दिवसांपूर्वीच सरकारने रेशन दुकानांवर चिकन, किराणा वगैरे विकण्याची परवानगी दिली होती.
त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता परंतु आता शासनाने चक्क रेशन दुकानांमधून भाजीपाला विकण्याचा नवा आदेश काढला असून त्यानुसार आता सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर जे नोंदणीकृत शेतकरी गट आहेत अशा गटांना आता रेशन दुकानांवर भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवता येणार असून अशा प्रकारची परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये जे रजिस्टर्ड शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जो काही भाजीपाला व फळे उत्पादित केले असतील अशा सभासद शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेला भाजीपाला प्रायोगिक तत्त्वावर विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी दिली आहे.
या आदेशामध्ये रेशन दुकानदार व शेतकरी कंपन्यांना काही अटी शर्ती लागू केले असून त्याचे पालन करणे गरजेचे आहे.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रेशन दुकानदारावर कोणत्याही प्रकारच्या मालाच्या विक्रीची सक्ती कंपन्यांना करता येणार नाही. ज्या शेतमाल परवानगी दिलेली आहे तो शेतमाल, उत्पादने आणि वस्तू व्यतिरिक्त इतर बाबींची विक्री करता येणार नाही.
यासंबंधीचा जो काही व्यवहार होईल तो शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्या कंपनीचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदार मध्येच राहील. सध्या तरी पुणे येथील शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीला पुणे जिल्ह्यात आणि फार्म फिस्ट प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड,नाशिक
या शेतकरी उत्पादक कंपनी मुंबई तसेच ठाणे शिधावाटप क्षेत्रातील 'इ' परिमंडळ व 'फ' परिमंडळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत शिधावाटप दुकानांवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाला व फळे विक्रीसाठी सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे.
Share your comments