निशिगंध हे कंदवर्गीय फूलझाड आहे. निशिगंधाच्या फुलाला रजनीगंधा किंवा गुलछडी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील उष्ण आणि हिवाळी हवामान पिकास चांगला मानवते. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे व औरंगाबाद जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर निशिगंध फुलांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात सुमारे ३००० हेक्टर क्षेत्रावर निशिगंधाची लागवड केली जाते. या फुलांचा उपयोग प्रामुख्याने गजरा, पुष्पहार, गुच्छ किंवा लग्न समारंभात सुशोभीकरणासाठी केला जातो त्यामुळे या फुलांना वर्षभर बाजारात चांगली मागणी असते. योग्य खत व पाणी व्यवस्थापण, किडी आणि रोग व्यवस्थापण करून शेतकरी या पिकातून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
जमीन व हवामान -
निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात व झाड मरते.
लागवड -
निशिगंधाची लागवड कंदापासून करतात. एका कंदापासून दुसऱ्यावर्षी ५ ते ६ कंद विकसित होतात.
निशिगंधाची लागवड जमिनीच्या सपाट वाफ्यामुळे किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. ३ मी. X २ मी. आकारच्या सपाट वाफ्यात ३० X २० सें.मी. अंतरावर ४ ते ५ सें.मी. खोल खड्डे करून लागवड केली जाते. निशिगंधाचे हेक्टरी १ लाख ते १.५ लाख कंद लागतात. लागवड पूर्ण झाल्यावर लगेच पाणी द्यावे.सर्वसाधारणपणे निशिगंधाची लागवड एप्रिल मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करतात.
खते -
लागवडीनंतर ४५ दिवसांनी हेक्टरी ६५ किलो नत्र व ९० दिवसांनी ६० किलो नत्र द्यावे. निशिगंधास प्रति वर्षी २०० किलो नत्र, ३०० किलो स्फुरद व ३०० किलो पालाश याप्रमाणे खते आवश्यक असतात.
पाणी -
निशिगंधाच्या पिकास ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केल्यास उत्पादनास चांगली वाढ होऊ शकते.
Share your comments