डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या साकोली येथील संशोधन केंद्राने लाल तांदळाचा सुधारित व सरळ वाण विकसीत केला आहे. पीडीकेव्ही साकोली रेड राइस -१ असे या नव्या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या संयुक्त संशोधन परिषदेच्या बैठकीत या वाणाच्या विदर्भातील लागवड व प्रसाराला मान्यता देण्यात आली आहे.'आम्ही विकसीत केलेल्या लाल तांदळाच्या वाणात पोषक अन्नद्रव्ये भरपूर आहेत. त्यामुळे शरीराची पौष्टिक घटकांची पूर्तता होण्यास मदत होते. त्याच्या लागवडीस व विक्रीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी साकोली संशोधन केंद्रावरुन बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार' असल्याचे साकोली, भंडारा येथील कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकर डॉ. जी. आर श्यामकूवर म्हणाले.
हेही वाच : आयसीएआरने विकसीत केले मिरचीचे नवीन वाण; या खरीप हंगात येईल भरघोस उत्पन्न
काय आहे या वाणाची वैशिष्ट्ये
नवा लाल भात वाण हा बुटका आणि मध्यम कालावधीचा आहे. सुधारित व सरळ असा हा वाण असून त्याचा दाणा आखूड व बारीक आहे. १३७ दिवसांत परिपक्क होतो. पानावरील करपा, लिफ स्काल्ड आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव यावर अधिक होत नाही. वाणाची सरासरी प्रति हेक्टर उत्पादकता ४० ते ४५ क्किंटल आहे. ग्राहक किंवा खवय्यांकडून अशा बारीक वाणाला अधिक मागणी राहते. त्यामुळे या वाणाला पसंती चांगली मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पोषण द्रव्ये
लाल वाणाच्या पॉलिश न केलेल्या भातात झिंक २३.१९ पीपीएम तर लोह १५.९७ पीपीएम प्रमाणात आहे. प्रथिनांचे प्रमाण ७.७९ टक्के आहे. खरीप २०२० या हंगामात सुमारे ४० हेक्टरवर या वाणाची लागवड करण्यात आली. साकोली येथील संशोधन केंद्रातून त्यासाठी बियाणे विक्री करण्यात आली. यापुढेही शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रति किलो ५० रुपये असा त्याचा दर आहे.
असे आहे भात क्षेत्र
महाराष्ट्र - १५.३१ लाख हेक्टर
पूर्व विदर्भ - ८.२५ लाख हेक्टर
उत्पादकता - १८२० किलो प्रति हेक्टर
Share your comments