नाशिक- कवडीमोल भावात कांदा विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारने १५ मार्चची वाट न पाहता निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी. तसेच बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांनी केली आहे.
कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र ३वरील चांडवड येथील चौफूलीवर संतप्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याच्या निर्यात धोरणाबाबत केंद्रातील भाजप सरकारच्या अस्थायी वृत्तीमुळेच जागतिक बाजारपेठ भारतीय कांद्याला व्यापाऱ्यांकडून मागणी कमी होत आहे. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आलेल्या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता केंद्रातील भाजप सरकारने तातडीने कांद्यासह सर्व शेतमालाल हमीभाव जाहीर करुन दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, अशा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पगार यांनी दिला आहे.
दरम्यान रास्ता रोकोच्यावेळी मोठ्आ प्रमाणात पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याला साधरण १ हजार ४५० रुपये प्रति क्किंटलचा भाव मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात शेतकरी आंदोलने करत आहेत. महाराष्ट्रात अंदाजे १ लाख हेक्टर कांद्याची लागवड केली जाते. तर नाशिक जिल्ह्यात राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी ३७ टक्के कांदा उत्पादन नाशिकमध्ये घेतले जाते.
का केली होती निर्यात बंदी
केंद्र सरकारने सहा महिन्यापासून कांदा निर्यात बंदी केली आहे. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात कांद्याच्या भावाने गगनभरारी घेतली होती. देशभरात कांद्याचे दर वाढले होते. देशातील काही राज्यात कांदा 160 रुपये किलो या दराने विकला जात होता. वाढत्या किंमतीचा दखल घेत केंद्र सरकारने निर्यात करण्यात येणाऱ्या कांद्यावर बंदी आणली होती. घाऊक किंमत निर्देशांकानुसार कांद्याची किंमत चलनवाढीचा दर डिसेंबरमध्ये ४५५.८ टक्के होता. जानेवारीत हा दर २९.४ टक्क्यांनी घसरला होता.
Share your comments