राज्यातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत हजारो रुपयांचा खर्च करून फळबागांची लागवड केली आहे. या कामात नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या अथवा डाळिंबाच्या बागा नजरेस पडतात. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकाची लागवड नजरेस पडते. येथील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पिकाला फाटा दिला आहे व डाळिंब या फळबागांची लागवड केली आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून कसमादे परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या नामक ग्रहण काळ बनून शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. कसमादे परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीला डाळिंब बागांमधून मोठे उत्पन्न प्राप्त होत होते.
मात्र गत चार वर्षापासून हवामानात होत असलेले बदल अवकाळी पावसाची अवेळी हजेरी यामुळे डाळिंब बागांवर विपरीत परिणाम घडून आला आहे. वेगवेगळ्या रोगांचे डाळिंबावर सदैव सावट नजरेस पडत असते, या रोगांमध्ये तेल्या नामक रोग मोठ्या प्रमाणात परिसरातील डाळिंब बागावर दिसून येत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हजारोंचा खर्च करून देखील पदरी निराशा पडताना दिसत आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणात तेल्या रोग नजरेस पडला डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मते तेल्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलेच प्रभावी औषध नसल्याने यावर नियंत्रण मिळवणे मोठ्या जिकरीचे कार्य आहे. परिणामीकसमादे परिसरातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहेत, काही शेतकरीनी तर या कार्यासाठी श्री गणेशा देखील केला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय डाळिंब संघाने डाळिंबाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे नमूद केले होते. डाळिंब संघाच्या मते, यावर्षी सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी डाळिंब लागवडीत घट झाली आहे. आणि आता बदललेल्या वातावरणामुळे तेल्या नामक ग्रहण लागल्याने अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाच्या बागा नामशेष करत आहेत. एकीकडे बदलत्या हवामानामुळे इतर पिके हातातून गेली आहेत आणि दुसरीकडे वातावरणाचा डाळिंब पिकावर देखील विपरीत परिणाम नजरेस पडत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी दोन्ही बाजूंनी आर्थिक दृष्ट्या भरडला जात आहे.
तेल्या आहे तरी काय?
अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे हवामानात प्रचंड आदर्ता निर्माण होते, याच आदर्तेमुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रसार होत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी स्पष्ट करतात. तेल्या हा एक जिवाणूजन्य रोग आहे, आणि या रोगाचे सर्वात भयावह वास्तव म्हणजे एकदा की हा रोग डाळिंब बागेत शिरला तर हा रोग कमी कालावधीतच संपूर्ण डाळिंब बागांवर पसरतो आणि त्यामुळे उत्पादनात घट होते, असे म्हणण्यापेक्षा तेल्या रोग शिरला की शेतकऱ्यांच्या हाताला डाळिंबच लागत नाहीत, तेल्या रोग संपूर्ण डाळिंब पीक भस्म करून टाकण्यास सक्षम आहे.
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मते अद्यापपर्यंत या भयावह रोगावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने, एकदा की हा रोग शिरला की शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागा तोडण्याची नामुष्की ओढवून येते. कसमादे परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा बदल सुरुवातीच्या काळात कारगर सिद्ध होत होता मात्र वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या या प्रयोगाला ग्रहण लागले असून आता शेतकऱ्यांना यातून उत्पन्न वाढण्याऐवजी त्यात घट घडून येत आहे, एवढेच नाही तर या प्रयोगामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी देखील झाल्याचे समजत आहे.
Share your comments