मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे १४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अतिरिक्त भाजीपाला मार्केट वापराविना पडून आहे. परिणामी बाजार समिती प्रशासनासह व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
या अतिरिक्त भाजीपाला मार्केटचे दोनवेळा उद्घाटन करण्यात आले. तरी देखील या ठिकाणी व्यापार सुरु होत नसल्याने बाजार समिती प्रशासन देखील हतबल झाले आहे. तर संबंधित घटकांकडून योग्य पाऊले उचलली जात नसल्याने मार्केट धूळखात पडले असल्याचेही मत काहीजण व्यक्त करत आहेत. केवळ वरवरच्या चर्चा आणि सभा होत असल्याने व्यापारी व प्रशासनास अपयश आल्याचे बोलले जात आहे.२६ वर्षांपूर्वी मुंबई शहरातील भाजीपाला मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यावेळी सर्वच व्यापाऱ्यांना जागा आणि परवाने मिळाले नसल्याने नवीन परवाना वाटप करण्यात आले. परिणामी परवानाधारक व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन व्यापाराला आणखी अडचणी निर्माण झाल्या.त्यामुळे या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्केट उभारण्याची मागणी सुरू झाली. त्यावेळी बाजार समितीच्या परिसरात भाजी मार्केटला लागून ११२३०चौरस मीटर जागेवर २८५ गाळे बांधण्याचा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने घेतला. मात्र त्यावेळी उभारलेल्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तर आजही मार्केट चालू करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.
त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणचे गाळे व्यापाऱ्या व्यतिरिक्त भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. अखेर २ फेब्रुवारी २०११ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. मार्केट सुरू झाले पण काही महिन्यांतच ते पुन्हा बंद झाले. १४ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही येथील मार्केट सुरु होत नसल्याने गाळेधारकांसह व्यापारी हैराण झाले आहेत. मुंबई बाजार समिती परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे हे मार्केट सुरू होण्यासाठी संबंधित व्यापारी, बाजार समिती प्रशासन व शासनाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी भाजीपाला व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्रीस परवानगी मिळावी यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. शिवाय मार्केटच्या वापरात बदल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. स्थानिक आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करून गाळे बंदिस्त करून दुकानांमध्ये रूपांतर केले गेले. भाजीपाला व्यतिरिक्त इतर कृषी मालाचा व्यापार करण्यास परवानगी देऊन मार्केटला कृषी होलसेल मार्ट असे नाव देण्यात आले.
Share your comments