शुक्रवारी देशाच्या सर्व भागात मॉन्सूनने धडक मारली असल्याचे माहिती हवामान विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे वेळेनुसार ८ जुलै रोजी देशभरात पोचणाऱ्या मॉन्सूनने यंदा तब्बल १२ दिवस आधीच देशाच्या सर्व भागात मजल मारली आहे. यंदा मॉन्सून हंगामात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे यंदा वेळेआधीच मॉन्सूनने अंदमान , निकोबार बेटावर दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडकला होता. त्यानंतर पुन्हा वाटचाल सुरू केल्यानंतर अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला.
याच दरम्यान अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ आले, या वादळामुळे मॉन्सून पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत ४ जून रोजी गोव्यासह महाराष्ट्राच्या उंबरठ्यापर्यंत मॉन्सून पोचला. दरम्यआन निसर्ग चक्रीवादळ निवल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल मंदावली. महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्यास सात दिवसांचा उशीर होत ११ जून रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. यादरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे चाल मिळाल्याने मॉन्सूनने एका दिवसाआधीच संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर गुजरात, मध्यप्रदेशाच्या काही भागात मॉन्सून गेल्यानंतर पुन्हा त्याचा वेग मंदावला. त्यानंतर पुन्हा मॉन्सूनची वाटचाल सुरू झाल्यानंतर चार दिवसातच मॉन्सूनने देश व्यापला. देशातील काही भागात मॉन्सून आपला रंग दाखवत असून मुसळधार वृष्टी होत असल्याची माहिती समोर येत आहे. बिहारमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. तर राजधानी दिल्लीतही पावसाने हजेरी लावली.
Share your comments