1. बातम्या

वीज आणि पशुधन : संरक्षणाचे प्रभावी उपाय

वीज पडल्याने केवळ पशुधनच नव्हे, तर शेतकरी आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. जीवितहानी सुध्दा होते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे वीजेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
livestock Effective protection news

livestock Effective protection news

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि यामुळे पशुधनाची हानी होण्याची शक्यता वाढते. भारतामध्ये महाराष्ट्रात वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांमध्ये भौगोलिक रचना, कमी झाडी आणि हवामानातील बदलांमुळे हा धोका अधिक जाणवतो.

वीज पडल्याने केवळ पशुधनच नव्हे, तर शेतकरी आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. जीवितहानी सुध्दा होते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे वीजेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. विजेपासून पशुधनाचे संरक्षण कसे करावे तसेच करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती देणारा लेख

वीज पडण्याची कारणे :

वीज पडण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :

  • विद्युत भार (Electric Charge): ढगांमधील पाण्याच्या थेंबांचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण होऊन सकारात्मक आणि नकारात्मक विद्युत भार निर्माण होतो.
  • विद्युत क्षेत्र (Electric Field): ढग आणि जमीन यांच्यातील विद्युत भाराचे अंतर वाढल्याने एक शक्तिशाली विद्युत क्षेत्र तयार होते. जेव्हा हे क्षेत्र हवेच्या प्रतिकारापेक्षा अधिक होते, तेव्हा वीज जमिनीवर कोसळते.
  • तापमान आणि आर्द्रता (Temperature and Humidity): उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करते, ज्यामुळे विद्युत भार लवकर वाढतो.
  • भौगोलिक घटक (Geographical Factors): उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करू शकतात.

पशुधनाचे वीजेपासून संरक्षण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना :

पशुपालकांनी आपल्या पशुधनाला वीजेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे :

  1. सुरक्षित आश्रय (Safe Shelter):
    • जनावरांना कधीही मोकळ्या जागेत बांधू नये.
    • पावसाचे वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील काम त्वरित थांबवून जनावरांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीमध्ये हलवावे.
    • गोठ्याचे छत आणि भिंती शक्यतो धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात. जर धातूचे बांधकाम असेल, तर ते व्यवस्थितरित्या अर्थिंग केलेले असावे.
  1. अचानक आलेल्या वादळात स्वतःचा बचाव (Self-Protection During Sudden Storms) :
    • जर तुमच्या अंगावरचे केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्वरित जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावेत, त्याभोवती हातांचा विळखा घालावा आणि हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी.
    • जनावरांना शक्य असल्यास खाली बसवावे.
    • वातावरण शांत झाल्यावर त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
    • अचानक गडगडाट होत असल्यास आणि जवळपास फक्त झाडेच असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावे.
    • जनावरे पाण्यात असल्यास त्यांना त्वरित बाहेर काढावे, कारण पाणी विजेचे सुवाहक असते.
  1. वीज सुवाहकांपासून सावधगिरी (Caution with Lightning Conductors):
    • गोठ्यातील लोखंडी पत्रे, वीजवाहक तारा किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करणे टाळावे.
    • गोठ्यातील वीज कनेक्शन आणि विद्युत अर्थिंग योग्य तसेच सुरक्षित असल्याची खात्री करावी. अर्थिंगमुळे वीज जमिनीत सुरक्षितपणे जाते आणि जनावरांना धोका टळतो.
  1. विद्युत उपकरणांचा वापर टाळा (Avoid Electrical Appliances):
    • आकाशात गडद काळे ढग जमून गडगडाट होत असल्यास गोठ्यातील कोणतेही विद्युत उपकरण चालू करू नये.
    • पशुधनाचे गोठे, कडबाकुट्टी यंत्र आणि गोठ्यातील इतर विजेचे साहित्य योग्यरीत्या अर्थिंग केलेले असावे.
  1. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा (Stay Away from Metal Objects):
    • जनावरांजवळ धातूच्या वस्तू (उदा. लोखंडी साधने) ठेवू नयेत.
    • शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी धातूच्या वस्तू जसे की कुऱ्हाड, कोयते, छत्री त्वरित दूर टाकाव्यात.
    • धातूची पाणीपात्रे उंच ठिकाणी किंवा मैदानातील खुल्या जागी ठेवू नयेत, कारण त्या वीज आकर्षित करू शकतात.
  1. स्थानिक हवामानाकडे लक्ष देणे (Pay Attention to Local Weather):
    • हवामान खात्याच्या सूचनांचे नियमितपणे पालन करावे.
    • दामिनी ॲप (Damini App): भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे (IITM) आणि भारतीय हवामान विभागाने विकसित केलेलेदामिनी वीज चेतावणी ॲपडाउनलोड करावे. या ॲपच्या माध्यमातून परिसरातील हवामानाचा आणि वीज पडण्याचा अंदाज मिळतो, ज्यामुळे वेळीच सुरक्षितता बाळगता येते.
    • वादळी वारे किंवा वीज पडण्याची शक्यता असल्यास जनावरांना गोठ्यातच ठेवावे.
  1. जनावरांचे व्यवस्थापन (Animal Management):
    • गडगडाटाने जनावरे घाबरण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना प्रेमळ वागणूक देऊन शांत करावे.
    • गोठ्यात योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी पंखे किंवा फॉगरचा वापर करावा.
    • जनावरांना पाणी आणि खनिज मिश्रणासह संतुलित आहार द्यावा, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  1. तांत्रिक उपाय (Technical Measures):
    • गोठ्यांवर वीजरोधक यंत्रणा (लाइटनिंग अरेस्टर) बसवावी. ही यंत्रणा वीजेचा झटका जमिनीत सुरक्षितपणे पोहोचवते.
    • स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रण प्रणालीचा वापर करावा.
  1. इतर सुरक्षितता उपाय (Other Safety Measures):
    • झाडाखाली आश्रय टाळाउंच झाडे वीज आकर्षित करतात. त्यामुळे वीज पडण्याचा धोका असताना झाडाखाली स्वतः आणि जनावरांना बांधू नये. पावसामुळे मृत्यू होणार नाही, पण झाडाखाली थांबल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
    • शेतामध्ये काम करत असताना आपण आणि जनावरे विद्युत तारांपासून किमान ५० फूट अंतरावर राहावे.
    • बैलांना नांगरत असताना तात्काळ लोखंडी जू पासून वेगळे करावे.
  1. 10.आपत्कालीन उपचार (Emergency Treatment):
    • जर एखाद्या जनावरावर वीज पडली, तर त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी.
  1. 11.जागरूकता (Awareness):
    • पशुपालकांना वीज पडण्याचे धोके आणि त्यावरील बचाव उपायांबाबत माहिती द्यावी.
  1. 12.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत (Assistance for Losses Due to Natural Disasters):
    • नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते.
    • वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्यास अल्प अत्यल्पभूधारक आणि भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळते. यासाठी मृत जनावराचा तलाठी यांचा पंचनामा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे शवविच्छेदन अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडे जमा करावी लागतात.

या सर्व उपायांचे पालन करून पशुपालक त्यांच्या पशुधनाचे वीजेच्या धोक्यापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे, सतर्क राहा आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या!

संकलन : विजय राऊतसहा. संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

English Summary: Monsoon electricity and livestock Effective protection measures monsoon news Published on: 22 May 2025, 12:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters