1. बातम्या

राज्यात आजपासून मॉन्सून सक्रिय; अनेक राज्यात पावसाची शक्यता


राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान तयार होत असल्याने आजपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून उत्तरप्रदेशपर्यंत विस्तारला असून, पूर्व भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बिहार आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती, गोव्यापासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. तर कोकण घाटमाथ्यावर सुरु असलेला पाऊसही ओसरला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४१ मिलीमीटर, सावतंवाडी येथे १३४ मिलीमीटर, तर कुडाळ ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज रत्नागिरीत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान देशाच्या इतर राज्यातही मॉन्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशपासून बिहार, बंगालपासून पुर्वेकडील राज्ये, महाराष्ट्रपासून ते मध्यप्रदेश आणि आसाम ते अरुणाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक राज्यातील नद्यांना पूरस्थिती आली आहे.  डोंगराळ प्रदेशातील लोकांवर दोन्ही बाजुंनी संकट आले आहे. एकीकडे दमदार पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे भुस्खलनचा धोका आहे. ऋषिकेश- बद्रीनाथच्या राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासह राजधानी दिल्लीतील हवा बदलली असून आज ५० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यासह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters