बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी विश्वस्त म्हणून काम करावे

Friday, 04 January 2019 08:20 AM


औरंगाबाद:
तमाम शेतकऱ्यांच्या जीवनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी विश्वस्त म्हणून काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड,खासदार रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या बाजार समितीने आदर्शवत असे काम करून खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीने काम कसे करावे याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. स्वनिधीतून शेतकरी, व्यापारी, हमाल अशा विविध घटकांसाठी काम करणारी ही पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. खरे तर कृषी उत्पन्न समितीने नीट काम केल्यास शेतकऱ्यांचे भले होईल. या माध्यमातून शेतीमाल खरेदी केंद्र चांगल्या प्रकारे चालविली जातील. शेतकरी हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. शेतमालाला भाव नसतो तेव्हा शेतकरी शेतमाल विकतो आणि जेव्हा शेतमालाला भाव चांगला असतो तेव्हा त्याच्याकडे शेतमाल उपलब्ध नसतो, ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र शासनाने ई-नाम (ई-राष्ट्रीय कृषी बाजार) सारखी ऑनलाईन ई-सेवा सुरू केली. त्यातून सिंगल मार्केट ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. या योजनेंतर्गत बाजार समित्यांनी जवळपास पाचशे पंचावन्न कोटींचा व्यवहार केला असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचा दर्जा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असून बाजार समितीने शेतकरी व मार्केट यांच्यातील दुवा म्हणून काम करायला हवे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणल्या. मागील शासनाच्या काळात अनेक वर्षात फक्त 450 कोटी रुपयांच्या  शेतमालाची खरेदी झाली होती. मात्र या शासनाच्या काळात साडेतीन वर्षात तब्बल साडेआठ हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी करण्यात आली. या शासनाने बाजार समितीतील भ्रष्ट कारभाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले. हे शासन शेतकऱ्यांचा विचार करीत आले आहे. शेतकऱ्यांसाठी या शासनाने नेहमीच पारदर्शक कारभार केला आहे. अजूनही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री. फडणवीस यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राधाकिसन पठाडे यांनी केले.

औरंगाबाद agriculture produce market committee APMC Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस कृषी उत्पन्न बाजार समिती aurangabad ई नाम enam
English Summary: Market committees should work as a trustee for farmers

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.