Mansoon 2022: भारतीय हवामान विभागाने (IMD) यावर्षी मान्सून (Mansoon) लवकरच बरसणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मान्सूनचे केरळ मध्ये आगमन देखील यावर्षी लवकरच झाले. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होत असतो मात्र या वर्षी मान्सून केरळमध्ये 29 मेला दाखल झाला.
यामुळे मान्सून यावर्षी महाराष्ट्र मध्ये देखील वेळेआधीच दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र अचानक मोसमी वाऱ्याने दिशा बदलल्याने मान्सूनचा प्रवास आता मंदावला आहे. या आता नवीन समीकरणामुळे मान्सूनचे राज्यात आगमन हे उशिरा होणार आहे.
मात्र यादरम्यान येत्या 4 ते 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे गेल्या तीन चार दिवसापासून उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या आशा देखील आता उंचावल्या आहेत.
खरं पाहता यावर्षी खरीप हंगामासाठी (Kharif Season) वातावरण पोषक असल्याचे सांगितले जातं आहे. विशेष म्हणजे या वर्षी मानसून हा चांगला राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले होते. यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र आता सुरुवातीलाच मान्सून हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून हा आता लांबणीवर पडल्याने खरिपाची तयारी करत असलेल्या शेतकरी बांधवांमध्ये निराशाचे वातावरण बघायला मिळत आहे. यामुळे मान्सूनच्या मनात नेमकं दडलंय काय असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहे.
आतापर्यंत राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पाऊस अद्याप पेरणीयोग्य झालेला नाही, तसेच 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये असा सल्ला देखील कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील शेतकरी बांधवांना सल्ला देत पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे सांगितले होते.
मात्र आता भारतीय हवामान विभागाने येत्या चार-पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांच्या मावळलेल्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून शेतकरी बांधव आता जोमाने खरिपाची तयारी करू लागला आहे. निश्चितच यामुळे तूर्तास तरी उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस आराम मिळणार असून शेतकरी बांधवही यामुळे पुन्हा एकदा प्रसन्न झाल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.
Share your comments