सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ‘महाफार्म’ ब्रँँडचा पंजाबमध्ये शुभारंभ

Saturday, 17 November 2018 07:44 AM


मुंबई:
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. सहकारी संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनाचे ब्रँँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्राने ‘महाफार्म’ ब्रँँड तयार केला आहे. या ‘महाफार्म’ ब्रँँडचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

चंदीगड येथील विक्री केंद्रांवर आणि लुधियाना येथे आयोजित पंजाब मार्कफेड प्रदर्शनात ‘महाफार्म’चा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी पंजाबचे सहकार व कारागृह मंत्री सुखजिंदर सिंग, खासदार संजय पाटील, पंजाब मार्कफेडचे व्यवस्थापकीय संचालक वरूण रूजम, चेअरमन अमरजित सम्रा, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पोकळी, फळ तंत्रज्ञान प्रमुख चंद्रकांत माळी, सहकार मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजाराम दिघे, सागर पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील सहकारी पणन व्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन अटल महापणन विकास अभियान राबवत आहे. दिनांक 25 जुलै 2018 रोजी महाराष्ट्र पणन महासंघाचे (महामार्कफेड) आणि पंजाब मार्केटिंग फेडरेशन (मार्कफेड), विदर्भ पणन महासंघ आणि पंजाब मार्कफेड तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि पंजाब मार्कफेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले होते. त्याचा पुढचा टप्पा म्हणून ‘महाफार्म’ ब्रँँडचा शुभारंभ पंजाबमध्ये करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये असलेली सेंद्रीय गूळ, हळद पावडर, काजू, काळा मसाला या उत्पादनाचा समावेश आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील कृषीमाल तसेच कृषी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीची व्यवस्था निर्माण केल्यास दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकेल. पंजाब राज्य कृषीच्या बाबतीत देशामध्ये अग्रगण्य आहे. तसेच तेथील शासनाच्या पणन महासंघामार्फत कृषीमालावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. पंजाबने केलेल्या ब्रँँडिंगच्या पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील कृषिप्रक्रिया व ब्रँँडिंग करण्यासाठी होईल. त्यासाठी पंजाबने सहकार्य करावे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

punjab mahafarm subhash deshmukh महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ Maharashtra Cooperative Development Corporation Limited सुभाष देशमुख महाफार्म पंजाब महामार्कफेड पंजाब मार्केटिंग फेडरेशन Markfed Punjab

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.