सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथील जागेत २० मेगावॉट वीजनिर्मितीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या कामाची लवकरच सुरुवात होणार असून, या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंगमुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सातारा शहर आणि शेतकऱ्यांच्यासाठी इनोव्हेटिव्ह सातारा या प्रकल्पाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोडशेडिंगची समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नामुळे महावितरणने सातारा आणि ग्रामीण भागासाठी २० मेगावॉटचे वीजनिर्मिती करणारे उपकेंद्र मंजूर केले आहे.नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे वीज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात २० मेगावॉट उपकेंद्रासाठी १५ गुंठे जागा देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या उपकेंद्राच्या निर्मितीसाठी सातारा शहर परिसर येथील पुढील २५ वर्षांसाठी विजेची समस्या सुटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे.
कण्हेर पाणीपुरवठा योजना व कास पाणीपुरवठा व तत्सम कारणासाठी जी वीज शेंद्रे एक्स्प्रेस फिडरकडून घ्यावी लागते. त्याचा सर्वोत्तम पर्याय या उपकेंद्रामुळे निर्माण होणार आहे. तसेच विविध पाणी उपसा योजनांनाही येथून वीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे. महावितरण व सातारा नगरपालिका यांच्या समन्वयातून हा प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाचा सातारा शहरासाठी आणि ग्रामीण भागातील लघुउद्योगांना फायदा होणार आहे. एकीकडे लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांसह औद्योगिक वसाहतीचे नुकसान होत आहे. मात्र, २० मेगावॉटच्या वीजनिर्मिती उपकेंद्रामुळे शहरात छोट्या लघुउद्योजकांना तसेच शेतकऱ्यांच्या जोडधंद्याना मोठा वाव मिळणार आहे.
Share your comments