जल संवर्धनासाठी जल शक्ती अभियानाचा शुभारंभ

Wednesday, 03 July 2019 08:22 AM


नवी दिल्ली:
जल संवर्धन आणि जल सुरक्षेसाठीच्या जल शक्ती अभियानाचा केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी प्रारंभ केला. 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 या पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सहभागाद्वारे हे अभियान चालवण्यात येईल. ईशान्येकडच्या राज्यांसाठी 1 ऑक्टोबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या काळात या योजनेचा अतिरिक्त दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. पाण्याची टंचाई असलेल्या जिल्ह्यात आणि भागात या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर, नागरिकांनी जल संवर्धनासाठी एकत्र येऊन जन आंदोलन उभारावे आणि पाणी बचतीद्वारे भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे काल केले होते.यासाठी नागरिकांनी, प्रसिध्द व्यक्तींनी आणि स्वयंसेवी संस्थांनी, यशोगाथा तसेच जलसंवर्धन या विषयावरचे चित्रपट, कल्पना, उपक्रम सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रत्येक घराला प्राधान्याने पिण्याचे पाणी पुरवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे जल शक्ती मंत्र्यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. जल शक्ती अभियान जनतेच्या जीवनात जल संवर्धनासाठी सकारात्मक बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी 2.3 लाखापेक्षा जास्त सरपंचाना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत यामुळे रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी, पाणतळी जतन करणे आणि जल संवर्धन काम करण्यासाठी जनतेला मदत होईल असे मंत्र्यांनी सांगितले. या प्रयत्नात माध्यमांनी सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जल संवर्धनासाठी जनतेने सक्रीय सहभागी होण्यासाठीचा संदेश देणारा पंतप्रधानांचा व्हिडीओ मंत्र्यांनी जारी केला.

"जल शक्ती अभियान "म्हणजे केंद्र सरकारची  विविध मंत्रालये, राज्य सरकारे यांचा समन्वित प्रयत्न असल्याचे पेय जल आणि स्वच्छता सचिव परमेश्वरन अय्यर यांनी सांगितले. 256 जिल्ह्यातल्या 1,592 भागात केंद्र सरकारची पथके भेट देतील आणि जिल्हा प्रशासना समवेत काम करतील. रेन वाॅटर हार्वेस्टिंग, पारंपारिक जल स्त्रोतांचे नुतनीकरण, पुनर्वापर, वनीकरण यांचा यात समावेश राहणार आहे.  

अभियानाबरोबरच यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसार मोहीम राबवण्यात येणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयं सहाय्यता गट, पंचायत राज संस्था सदस्य, एनएसएस सारखे युवा संघटना, माजी सैनिक आणि निवृत्त व्यक्तींच्या सहाय्याने हा प्रसार करण्यात येईल.

Jal Shakti Abhiyan जल शक्ती अभियान गजेंद्रसिंह शेखावत Gajendra Singh Shekhawat रेन वाॅटर हार्वेस्टिंग Rain Water Harvesting

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.