सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध पिक प्रणालीचा वापर करावा. - डॉ.विलास खर्चे संचालक संशोधन डॉ.पं.दे.कृ.वि.अकोलाआज दिनांक 25 जुलै 2022 रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात मा. डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या हस्ते तसेच मा. डॉ. नीता खांडेकर, निर्देशक, भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती तालुकातील गोपाळपुर व पिंपरी येथे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थित पार पडला. तत्पूर्वी मा. डॉ. निता खांडेकर मॅडम यांनी अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्पाअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे भेट दिली. दोन्ही मान्यवरांचे स्वागत व सत्कार या केंद्राच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे यांनी शाल व श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन केले.
या केंद्रावरील सोयाबीन पैदासकार डॉ. सतीश निचळ यांनी या केंद्राविषयी माहिती दिली तसेच या केंद्रावर होणारया संशोधनाची सद्यस्थिती व पुढील दिशे बद्दल मान्यवरांना अवगत केले. या केंद्राच्या प्रमुख उपलब्धी मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेल सोयाबीनच्या चार नवीन वानांची माहिती व त्याचे गुण वैशिष्ट्य सांगितले.यामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेले सुवर्ण सोया,पीडीकेवी पूर्वा तसेच अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेले पीडीकेवी अंबा या वाणांचा उल्लेख केला. सदर वाण हे अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य भारतामध्ये लोकप्रिय होईल याची हमी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी व सुरू असलेले संशोधनाचे काम अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी या केंद्रावर आवश्यक असलेल्या बाबींसाठी मा. निर्देशक यांच्याकडे मागणी केली.यानंतर मा. डॉ. नीता खांडेकर यांनी या केंद्राच्या संशोधन कार्याची प्रशंसा करून भविष्यातील सोयाबीन संशोधनाची दिशा ठरविताना या पिकातील होत असलेली कमी उत्पादकतेवर चिंता व्यक्त केली.
त्यावर मात करण्यासाठी यापुढील संशोधन मुख्यत्वेकरून जैविक व अजैविक ताणास बळी न पडणारे, अति उष्णता सहनशील वाणांचा विकास करणे तसेच पचनास कठीण असे घटक विरहित वाणाचा विकास करण्यावर भर दिला.मा. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेले सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा वापर करण्यासोबतच आधुनिक लागवड तंत्रज्ञानावर विशेष भर दिला. सातत्याने एकाच जमिनीवर सोयाबीनची वर्षानुवर्षे लागवड केल्यामुळे, खोल नांगरटी व जमिनीची जास्त मशागतीमुळे येथील जमिनीतील कर्ब दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. तसेच हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे व पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होत असल्याचे सांगितले. सोयाबीनची उत्पादकता वाढवायची असेल तर सर्व शेतकरी बंधूंनी सामूहिकरित्या एकत्र येऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारसींचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगितले.
कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात करताना गोपाळपूर व पिंपरी येथील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर उपस्थित राहून मा. संशोधन संचालकांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या उद्बोधनात त्यांनी सोयाबीनच्या बीज प्रक्रियावर विशेष भर देताना सोयाबीनचे पीक कीड व रोगांपासून कसे मुक्त राहील हे सांगितले. रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे शेतकरी बंधूंना बियाण्याची बचत करता येऊ शकते व सोबतच मृद व जलसंधारणाचे काय फायदे होतात हे शेतकऱ्यांना आत्मसात करण्याचे सांगितले. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी विविध पीक प्रणालीचा अंतर्भाव करणे यावर त्यांनी विशेष भर दिला. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या निर्देशक डॉ. नीता खांडेकर मॅडम तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे साहेबांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ तेथील स्थानिक शेतकऱ्यांसोबतच कृषी महाविद्यालय, अकोला येथील कृषी कार्यानुभव (रावे) अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा झाला.
Share your comments