नवी दिल्ली: कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) तयार केलेल्या शेतकरीस्नेही मोबाईल अॅपचे अनावरण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषिभवन इथे केले.
शेतातून बाजारापर्यंत, शेतकरी उत्पादक संस्था संकलन केंद्रापर्यंत आणि गोदामापर्यंत शेतमालाची वाहतूक ही प्राथमिक वाहतुकीत समाविष्ट आहे. द्वितीय स्तरावरील वाहतुकीत बाजारातून शेतमालाची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यातील बाजारपेठेत, प्रक्रिया केंद्रात, रेल्वे स्थानकात, गोदामात आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे वाहतूक करणे अभिप्रेत आहे.
लॉकडाऊन दरम्यान कृषी उपक्रम चालूच ठेवावे लागतील असे कृषिमंत्री तोमर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार कृषी क्षेत्राला सवलती देण्यात आल्या आहेत. कापणी आणि पेरणी चालू असताना किसान रथ अँपद्वारे वाहतूक सुलभ होईल कारण यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना शेतातून बाजारापर्यंत आणि देशातील एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत शेतमालाची वाहतूक करणे सोपे होईल असे त्यांनी सांगितले. जेव्हा देश कोविड-19 च्या भीषण संकटातून जात आहे, तेव्हा या 'किसान रथ' अॅपद्वारे देशातील शेतकरी, शेतकरी उत्पादन संस्था (एफपीओ), आणि सहकारी संस्थांना त्यांच्या शेतीमालाचे हस्तांतरण शेतापासून बाजारपेठेपर्यंत करण्यासाठी योग्य वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
“किसान रथ” मोबाईल अॅपवर अन्नधान्य (तृणधान्य, भरडधान्य, डाळी इत्यादी), फळे आणि भाजीपाला, तेलबिया, मसाले, तंतुमय पिके, फुले, बांबू, ओंडके आणि जंगलातील किरकोळ उत्पादने तसेच नारळ इत्यादी विविध गोष्टींच्या वाहतुकीसाठी वाहतुकीचा योग्य पर्याय कोणता ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समजून घेता येते. या अॅपवर नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी (शीतगृह सुविधेद्वारे) व्यापाऱ्यांना मदत होते.
शेती उत्पादनांची वाहतूक करणे हा पुरवठा साखळीचा आवश्यक आणि अपरिहार्य घटक आहे. लॉकडाऊनमुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत “किसान रथ”, शेतकरी, गोदामे, एफपीओ, एपीएमसी मंडळे आणि राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य खरेदीदारांमधील सहज आणि अखंड पुरवठा साखळी सुनिश्चित करेल आणि वेळेवर वाहतूक सुविधा मिळाल्यामुळे अन्नाची नासाडी कमी होईल. नाशिवंत वस्तुंना चांगला भाव मिळण्यासही हे उपयुक्त ठरेल.
माल पाठविणारे (शेतकरी, एफपीओ, खरेदीदार/व्यापारी) या अॅपवर वाहतुकीची आवश्यकता असल्याचे कळवितात; बाजारातील वाहतूकदार याची नोंद घेतात आणि ट्रकचालक किंवा इतर वाहतूक सेवा देणाऱ्यांशी बोलून त्यांचा वाहतूक दर इथे टाकतात. ज्याला माल पाठवायचा तो यातून दराची तुलना करून त्याला परवडणाऱ्या ट्रकचालकाबरोबर बोलतो आणि करार अंतिम करतो. एकदा ट्रिप पूर्ण झाल्यावर, वापरकर्ता अॅपमध्ये ट्रकसाठी रेटिंग/अभिप्राय प्रदान करू शकतो जो कालांतराने वाहतूकदारांना त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी अभिप्राय यंत्रणा ठरू शकतो. यामुळे भविष्यात वाहतूकदार निवड प्रक्रियेत ग्राहकांना मदत होणार आहे.
या ‘किसान रथ’ मोबाइल अॅपमुळे राज्यांतर्गत आणि आंतरराज्यातील कृषी आणि फलोत्पादनाच्या व्यापारास चालना मिळणार आहे असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. “किसान का अपना वाहन” अशी टॅगलाईन असलेले हे अॅप कृषी उत्पन्न वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल असंही तोमर यावेळी म्हणाले. हे अॅप सुरुवातीला अँड्रॉइड व्हर्जन मध्ये 8 भाषांमध्ये उपलब्ध केले जाईल आणि त्याचा उपयोग देशभरात सर्वत्र करता येईल.
Share your comments