सध्या शहरीकरणाकडे वाढलेला युवक-युवतींचा ओढा थांबवत गाव खेड्यांमध्ये चैतन्य फुलविण्यासाठी ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या शेती आणि शेतीपूरक उत्पादनांवर गाव पातळीवर प्रक्रिया करण्यासाठीच्या उद्योगांना बढावा देणे काळाची गरज आहे आणि याकरिता
महिलांच्या उद्यमशिलतेला चालना देत त्यांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यकता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)अकोला, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अकोला व कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांचे सहयोगाने जागतिक महिला दिनाचे पार्श्वभूमीवर आयोजित "विदर्भस्तरीय महिला मेळाव्याचे" प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. स्वयंसहायता बचतगटांमधून महिला अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करतात, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र मॉल उभारुन महिला बचतगटांनी उत्पादीत केलेली उत्पादने प्राध्याण्याने विक्री केली जातील असे आशादायक प्रतिपादन देखील ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपल्या ओघवत्या मनोगतात करीत मातृशक्तीला उद्योजकतेकडे अग्रेसीत केले.पालकमंत्री म्हणाले की, जीवनात बदल घडत असतात आणि ते महत्त्वाचेही असतात. स्त्री शक्ती ही संसार उभा करणारी शक्ती आहे. शासन हे नेहमीच प्रयत्न करणाऱ्यास सहाय्यकारक असते. महिला या मोठ्या कौशल्याने उत्पादने तयार करतात.
त्याच्या गुणवत्तेला तोड नाही. मात्र त्यांच्या विपणनाची पुरेशी व्यवस्था नाही. ही व्यवस्था आपल्यास्तरावर निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात येत्या 11 एप्रिल महात्मा फुले जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व बचतगटांच्या प्रमुखांशी हितगुज करुन धोरण ठरविण्यात येईल. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्यात प्रगतीसाठी व जिवनमान उंचावण्यासाठी आर्थिक प्रगती होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यावेळी शाश्वत ग्रामविकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यावश्यक:- कुलगुरू डॉ. विलास भाले
बचत गटांच्या माध्यमातून एकात्मिक पद्धतीने ग्रामविकास दृष्टीपथात येईल :- जिल्हाधिकारी निमा अरोरा
कृषी महाविद्यालय अकोलाच्या स्व. के.आर.ठाकरे सभागृहात आयोजित या अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तितक्याच भावनाप्रधान सोहळ्याचे अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले होते. अकोला जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.सौरभ कटीयार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य सर्वश्री श्री. मोरेश्वर वानखेडे व श्री. विठ्ठल सरप पाटील, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ.ययाती तायडे, यांचेसह आयोजक संचालक विस्तार शिक्षण, डॉ.राजेंद्र गाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तर सौभाग्यवती कीर्ती विलास भाले, विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ.सुरेंद्र काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ. नितीन कोष्टी, कृषि महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. धनराज उंदिरवाडे, विद्यापीठ नियंत्रक श्री राजीव कटारे, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाच्या समन्वयक वर्षा खोब्रागडे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद चे जिल्हा समन्वयक श्री गजानन महल्ले,
कृषी विज्ञान केंद्र अकोला चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.उमेश ठाकरे, यांचेसह
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील महिला अधिकारी कर्मचारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांचे माध्यमातून कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त अकोला जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधून उपस्थित झालेली मातृशक्ती सभागृहात उपस्थित होती. याप्रसंगी समस्त मातृशक्तीची वतीने आपले मनोगत व्यक्त करताना अकोला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी बचत गटांचे महत्त्व व त्यातून साध्य होणारा ग्रामविकास अतिशय साध्या सोप्या अल्प शब्दात व्यक्त करीत आता एकट्याने नव्हे तर समूहाने एकत्रित येत सर्वच शासकीय निमशासकीय विभागांचे सहयोगातून स्वतःचा आणि पर्यायाने गावाचा विकास करण्यासाठी बचत गटांचे जाळे विणावे असे आवाहन उपस्थित महिलांना केले व विद्यापीठाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक देखील आपल्या भाषणादरम्यान केले. तर शाश्वत ग्रामविकासासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज झाली असून महिलांची जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची मानसिकता यासह नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्या कडील कल परिवार जणांनी ओळखत आपले कडे उपलब्ध संसाधनांचा साधक-बाधक विचार करीत घरातील महिलेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, खादी व ग्रामोद्योग केंद्र सारख्या किंवा इतरही कुटिरोद्योग ग्राम उद्योगाचे धडे देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित करीत परिवाराचा विकास साध्य करावा असे आवाहन करताना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये पालकमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांचे विशेषत्वाने आभार व्यक्त करीत अकोला जिल्ह्यातील तीन हजार युवक-युवतींसाठी प्रात्यक्षित आधारित उद्योजकता विकास व कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजनातून येत्या काळात अकोला जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार होत जिल्ह्याचा लौकिक वाढत अकोला जिल्ह्याचे उद्योजकता विकासाचे हे मॉडेल संपूर्ण राज्यभर वाखाणले जाईल असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला.
याप्रसंगी संपूर्ण विदर्भातून आपल्या कार्यकुशलतेने जिद्दीने परिश्रमाने संकटसमयी देखील न डगमगता नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपल्या परिवाराला सावरणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये नंदाताई शंकरराव पिंपळशेंडे रा. वेडली जि. चंद्रपूर, कल्पना विजय दामोदर रा,. सुनगाव ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा, सौ संगीता ताई देशमुख राहणार भांबेरी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला, लताताई संतोष देशमुख रामनगर ता. रिसोड, वंदना देविदास धोत्रे, रा. विवरा ता. पातुर जि. अकोला, भारतीताई हितेश येळे राहणार चेंबूर टोला तालुका आमगाव जिल्हा गोंदिया, क्षिप्रा भास्कर राव मानकर, अमरावती, प्रतिभा प्रभाकर चौधरी रा. नवेगाव जि. गडचिरोली, छायाताई विलास कुइटे रा. बेलखेड ता. तेल्हारा जि. अकोला, सिंधुताई निर्मळ रा. भेंडवळ ता. जळगाव जामोद जि. बुलडाणा, इंदिरा शंकर राव कांबळे रा. कोली ता बाभुळगाव जि. यवतमाळ, विमल संतोष गोरे रा. सोनखास जि. वाशिम, भावना भोजराज भागडे रा. वर्धा, प्रीती मधुकर ढोबाळे रा. उमरी ता. कारंजा जि. वर्धा. या महिलांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन संजीव सलामे यांनी केले.
तत्पूर्वी महिला बचतगटांसाठी प्रकल्प संचालक आत्मा, अकोला यांचे वतीने आयोजित प्रक्रिया युक्त पदार्थांची प्रदर्शनाचे उद्घाटनही पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचे माध्यमातून अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्यातील व्यवसायिक क्षमतेचे व उद्योजकतेचे प्रदर्शन केले याप्रसंगी त्यांच्याद्वारे उत्पादित पदार्थांची विक्री सुद्धा करण्यात आली. महिला दिनाचे आयोजनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांचेसह विस्तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि अथक परिश्रम घेतले.
Share your comments