1. बातम्या

रब्बी पिकांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेतकऱ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली: भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) ने कोविड-19 प्रादुर्भावाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांची काढणी व मळणी आणि काढणीनंतरचे उत्पादन, साठवण आणि विपणनासाठी पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) ने कोविड-19 प्रादुर्भावाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांची काढणी व मळणी आणि काढणीनंतरचे उत्पादन, साठवण आणि विपणनासाठी पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पिकांची काढणी व मळणी

कोविड-19 प्रसाराचा धोका असताना रब्बी पिके परिपक्वतेच्या स्थितीत आहेत. शेतीची कामे नियोजित वेळेनुसार व्हावी लागतात. त्यामुळे उत्पादनाची काढणी आणि हाताळणीबरोबरच उत्पादन बाजारपेठेत नेणे या प्रक्रिया अपरिहार्य आहेत. तथापि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन सुरक्षिततेच्या उपायांचे पालन केले पाहिजे. जसे कि साध्या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणेसाबणाने हात धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे,चेहऱ्यावर मास्क आणि संरक्षक कपडे घातले पाहिजेत तसेच अवजारे व यंत्रसामुग्री स्वच्छ केली पाहिजे. शेती कामातील प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांनी सुरक्षा उपाय आणि सामाजिक अंतरांचे अनुसरण केले पाहिजे.

  • अनेक उत्तरी राज्यांमध्ये एकत्रितरित्या गहू कापणीचे काम होत असून अशा कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या राज्यात आणि इतर राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुरुस्तीदेखभाल आणि कापणीच्या कामात गुंतलेल्या मजुरांची खबरदारी व सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
  • मोहरी हे रब्बी हंगामातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे आणि हाताने कापणी हंगाम सुरू आहे. आधीच जेथे कापणी झाली तेथे मळणी सुरु आहे.
  • मसूर, मका आणि मिरचीची काढणी चालू आहे आणि हरभऱ्याची लवकरच होईल.
  • ऊस तोड जोमात सुरु आहे आणि उत्तरेकडे आता शेतमजुरांकरवी लागवडीचीही वेळ आली आहे.
  • पीक काढणी, फळे,भाज्या, अंडी आणि मत्स्य व्यवसायातील मजुरांनी काम सुरु करण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम करताना तसेच काम संपल्यावर वैयक्तिक स्वच्छता पाळणे तसेच परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.
  • मजुरांकरवी पिकांची कापणी आणि माल उचलताना 4 ते 5 फूट अंतरावर पट्टे तयार करून एका पट्ट्यात एकाच व्यक्तीला काम करू द्यावे जेणेकरून या शेतमजुरांमध्ये सुरक्षित अंतर राहील.
  • शेतीकामात गुंतलेल्या सर्वानी मास्कचा वापर करावा आणि ठराविक कालांतराने हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • विश्रांतीच्या काळात,जेवताना, संकलन केंद्रात उत्पादन पोहचवताना, माल भरताना किंवा उतरवताना परस्परांमध्ये 3 ते 4 फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे.
  • शक्य असेल तिथे शेती कामाची सुनियोजित आखणी करा आणि एकाच दिवशी अनेक कामगारांना काम देणे टाळा.
  • शेतीची कामे सुरु असताना शक्यतो ओळखीच्या लोकांना आणि व्यवस्थित चौकशी करून काम द्या जेणेकरून संशयित किंवा विषाणू वाहक व्यक्तीचा प्रवेश टाळता येईल.
  • शक्य असेल तेव्हा माणसांऐवजी यंत्रांचा वापर शेती कामात करा. यंत्र चालवण्यासाठी आवश्यक तेव्हढ्याच लोकांना काम करायची परवानगी द्या.
  • कापणीनंतर मालाचे 3 ते 4 फुटाच्या अंतरावर छोटे ढीग करून ते उचलण्याचे काम 1 ते 2 लोकांकडून करून घेता येईल.
  • मका आणि भुईमूग पिकांसाठी विशेषतः जेव्हा शेतकरी गटाकडून कापणी यंत्रांची देवाण-घेवाण होऊन ती वापरली जातात तेव्हा ती व्यवस्थित स्वच्छ धुतली पाहिजेत. वारंवार स्पर्श केलेले यंत्रांचे भाग साबणाने पुष्कळ वेळ धुण्याचा सल्ला दिला जातो.

कृषी उत्पादनाची काढणी पश्चात साठवण आणि विक्री

  • वाळवणेमळणी करणे,पाखडणेस्वच्छ करणे,प्रतवारी करणेवर्गीकरण करून वेष्टनात बांधणे इत्यादी शेती स्तरावरील कामे करताना द्रवपदार्थ किंवा धूलिकण श्वसन मार्गात प्रवेश करू नयेत म्हणून तोंडावर मास्क लावावा.
  • कापणी केलेले धान्य,बाजरी, डाळींचे शेतात/घरात साठवण्यापूर्वी योग्यरित्या वाळविल्याची  खात्री करुन घ्या आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या हंगामात वापरलेल्या गोण्यांचा पुनर्वापर करू नका. 5% निंबोळी अर्कात भिजवल्यानंतर वाळलेल्या गोणींचा वापर करा.
  • शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या गोण्यांमध्ये शेतात शेतमाल साठविताना किंवा नंतर चांगली किंमत मिळेल म्हणून जवळपासच्या शीतगृहात, गोदामांमध्ये, कोठारात माल साठविताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
  • शेतमाल भरून त्याची वाहतूक करताना आणि विक्रीसाठी बाजारात किंवा लिलावाच्या ठिकाणी नेताना वैयक्तिक सुरक्षा घेतली पाहिजे.
  • योग्य त्या कागदपत्रांच्या आधारावर बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडे माल वाहून नेण्याची परवानगी दिली जाते आणि त्याचा मोबदला वसूल करताना खबरदारी घेण्यास सांगितले जाते.
  • बियाणे उत्पादन करणाऱ्या राज्यांमधून त्याची वाहतूक लागवड करणाऱ्या राज्यांत (दक्षिणेकडून उत्तरेकडे) करून पुढील खरीप पिकांसाठी बियाणे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, उदा. उत्तरेत एप्रिल महिन्यात पेरणीसाठी हिरव्या चाऱ्यासाठी एसएसजी बियाणे हे दक्षिण राज्यांमधून येते.
  • टोमॅटो, कोबी, हिरव्या पालेभाज्या, काकडी आणि इतर वेलवर्गीय भाज्यांचा पुरवठा किंवा थेट विक्री करताना खबरदारी घ्यावी.

शेतातील उभी पिके

  • गहू उत्पादक प्रदेशातील तापमान सरासरीपेक्षा अजूनही कमी आहे त्यामुळे पिकाची कापणी 10 एप्रिल नंतर म्हणजे 10 ते 15दिवस उशिराने होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी कोणताही तोटा सहन न करता 20 एप्रिल पर्यंत थांबवावी जेणेकरून तारखा जाहीर होईपर्यंत त्यांना व्यवस्थापनासाठी पुरेसा वेळ मिळेल.
  • दक्षिणेकडील राज्यात रब्बी हंगामातील भात हा दाणे भरण्याच्या अवस्थेत असून कणसे वाकल्याने मोठा परिणाम झाला आहे. बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे काम सोपविलेल्या कामगारांकडून फवारणी करून घेताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
  • भात काढणीच्या अवस्थेत अवकाळी पाऊस पडल्यास बियाणे रुजवण रोखण्यासाठी 5% मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी.
  • बागायती पिकांमध्ये उदा. आंब्यासारख्या फळ धारण अवस्थेत पोषक फवारणी सारखी कामे करताना उपकरणांची योग्य ती हाताळणी, आणि स्वच्छता आवश्यक आहे.
  • उन्हाळ्यात भाताच्या पडीक जमिनीत कडधान्य घेताना पिकावर पिवळ्या मोझेक अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन कीटकनाशकांची फवारणी करावी.

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात शेतकरी आणि शेती क्षेत्रासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालील कृषी प्रक्रियांना किंवा शेती संबंधित गोष्टींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे.

  • पशुवैद्यकीय रुग्णालये.
  • किमान आधारभूत किमतीसह कृषी उत्पादनांच्या खरेदीमध्ये गुंतलेल्या संस्था.
  • कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित किंवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या ‘मंडी’
  • शेतकरी व शेतीची कामे.
  • शेती यंत्रणेशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी)
  • खते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पॅकेजिंग विभाग.
  • एकत्रित कापणी आणि पेरणीची यंत्रे किंवा मजुरांची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यात होणारी वाहतूक तसेच इतर शेती/बागायती उपकरणे.

या सवलतींमुळे शेती प्रक्रियेशी निगडित कामे सुरळीत होऊन शेतमालाच्या पुरवठ्यावर किंवा शेतकऱ्यांवर लॉकडाउनचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालययांच्या विनंतीच्या आधारे अपवादांमधील कलम 2, 4, 5 आणि 6 मध्ये भर घालून भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने क्र. 40--3/2020-डीएम-आय (ए) दिनांक 24, 25 आणि 27मार्च 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊन दरम्यान अंमलबजावणीसाठी संबंधित मंत्रालये/राज्य विभाग आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक दिशा निर्देश जारी केले आहेत. कृषी आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित क्रिया सुरू ठेवण्यासाठी विविध मंत्रालये आणि राज्य सरकारच्या विभागांना अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

English Summary: in wake of covid-19 spread, icar issues advisory to farmers for rabi crops Published on: 02 April 2020, 07:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters