राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गाईचे पालन केले जाते, शेतकरी बांधव शेतीसाठी जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाची निवड करत असतात. राज्यातील पशुपालक शेतकरी दुग्ध उत्पादन वाढीच्या अनुषंगाने गुजरात राज्यातील गीर गायीचे मोठ्या प्रमाणात पालन करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत देखील गेल्या काही वर्षापासून गिर गाईचे पालन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे नजरेस पडत आहे. तसं बघायला गेलं तर गेल्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक हे दोन जिल्हे डांगी गायीच्या पालनासाठी विशेष ओळखले जात होते. मात्र, आता मागील काही वर्षात दुग्ध उत्पादन वाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गीर गायीच्या पालनाला पसंती दर्शवली आहे.
गाय पालनात दुग्ध उत्पादनाला मोठे महत्त्व असते, आणि गोवंशसंवर्धनात सर्व उत्पन्न हे दुग्धउत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. म्हणून अलीकडे पशुपालक शेतकरी दूध उत्पादनक्षमता चांगली असलेल्या गाईंचे पालन करताना दिसत आहेत. असे असले तरी दूध कमी देणाऱ्या गोवंशाचे खोंड शेतकामासाठी मजबूत असल्याचे सांगितले जाते. पूर्वी शेतीची संपूर्ण पूर्व मशागत बैलांच्या साहाय्याने केली जात असल्याने, कमी दूध देणाऱ्या गोवंशाचे पालन केले जात होते, कारण की त्यापासून तयार होणारे खोंड शेतकामासाठी मजबूत असायचे. मात्र, शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिकता वाढत चालली आहे, शेती क्षेत्रात आता नवनवीन उपकरणांचा तसेच यंत्रांचा वावर वाढला आहे, परिणामी जमिनीची पूर्वमशागत पासून ते पेरणी आणि काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राने केली जाऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलांची विशेष आवश्यकता भासत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता पशुपालन फक्त आणि फक्त दुग्ध उत्पादन घेण्यासाठी केले जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी चांगले दूध उत्पादन क्षमता असलेल्या पशूंचे पालन करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यातील विशेषता घोटी इगतपुरी दिंडोरी कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागात डांगी गाईचे पालन दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी या परिसरातील पशुपालक शेतकरी गुजरात राज्याची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी गिर गाईचे पालन करताना दिसत आहेत.
डांगी गाय आणि गिर गाई मधील फरक
डांगी गाय
डांगी गाय जास्त पावसाच्या प्रदेशात देखील पाळली जाऊ शकते, डांगी जातींचे गोवंश जास्त पावसाच्या प्रदेशात राहण्यास सक्षम असतात. डांगी गाय साधारणता 22 वर्षांपर्यंत जगू शकते. तिच्या संपूर्ण जीवनमानात डांगी गाय 14 वेळा वेताला येऊ शकते. एका दिवसात आठ लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असते.
गिर गाय
गीर गायीच्या आयुर्मान सुमारे पंधरा वर्षे असल्याचे सांगितले जाते. गिर गाय तिच्या संपूर्ण आयुर्मानात सुमारे दहादा वेतास येऊ शकते. गिर गायीची दुग्धोत्पादन क्षमता डांगी गाईच्या तुलनेत खूपच अधिक असते, गीर गाय देशातील सर्वोच्च दुग्धोत्पादन क्षमता असलेल्या गाईंच्या यादीत शीर्षस्थानी येते. गिर गाय दिवसाला 12 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असते. मात्र असे असले तरी गिर गायीची गाभण राहण्याची क्षमता डांगी गाई पेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. एकंदरीत डांगी गाईचे खोंड हे शेतकामासाठी मजबूत असतात मात्र गिर गाईचे खोंड हे शेतकामासाठी मजबूत नसतात.
Share your comments