राज्यात सर्वात जास्त कांदा लागवड नाशिक जिल्ह्यात नजरेस पडते, नाशिक जिल्ह्यातच कांद्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात आतापर्यंत म्हणजे सुमारे बारा दिवसात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास चार लाख किंटल कांद्याची विक्रमी आवक झाल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील इतर बाजारपेठेच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.
मागच्या आठवड्यात लासलगाव बाजारपेठेत 1 लाख 26 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. जिल्ह्यात एका आठवड्यात सर्वात जास्त आवक लासलगाव बाजार पेठेत नजरेस पडली. यादरम्यान लासलगाव बाजार पेठेत कांद्याच्या बाजार भाव आज देखील कमालीची स्थिरता बघायला मिळाली. मागच्या आठवड्यात लाल कांद्याला कमीतकमी 700 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त 2500 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव यादरम्यान कांद्याला मिळाल्याचे वृत्त समोर येत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अमावस्याच्या दिवशी देखील कांद्याचे लिलाव आता सुरू ठेवले जात आहेत यामुळे देखील लासलगाव बाजार पेठेत कांद्याची आवक वधारल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार पेठमध्ये दररोज 60 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असल्याचे बाजारपेठेतील व्यापारी सांगत आहेत.
यामुळे लासलगाव बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे समजत आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत अलीकडे लासलगाव बाजार पेठेत कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. मागच्या वर्षी 2020 पेक्षा 3 लाख क्विंटल पेक्षा अधिक आवक या बाजार समितीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर बाजार समितीपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीवर जास्त भर असल्याचे समजत आहे.
किती झाली आवक आणि काय आहे आवक वाढण्याचे कारण
2020 मध्ये लासलगाव बाजार पेठ शनिवारी, अमावास्येच्या दिवशी बंद ठेवली जात असे. मात्र 2021 मध्ये परंपरागत चालू असलेल्या या रुढीला फाटा देत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने अमावस्याच्या दिवशी व शनिवारी बाजारपेठ सुरूच राहण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे 2021 मध्ये कांद्याची आवक लक्षणीय वधारली होती.
डिसेंबर 2020 मध्ये लासलगाव बाजार पेठेत फक्त दोन लाख 30 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती, मात्र डिसेंबर 2021 मध्ये लासलगाव बाजार पेठेत 5 लाख 70 हजार क्विंटलची विक्रमी आवक नोंदविण्यात आली होती. आणि आता या नववर्षात अवघ्या बाराच दिवसात 4 लाख 40 हजार क्विंटलची विक्रमी आवक रेकॉर्ड करण्यात आली आहे.
Share your comments