मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. यातच नैर्ऋत्येकडून येणाऱ्यांच्या वाऱ्यांचे प्रवाह मजबूत होत असल्याने कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर आजपासून पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान मंगळवारी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही राज्यात तापमानात वाढ झाली होती. याच दरम्यान एक आनंदाची बाब म्हणजे दक्षिण पश्चिम मॉन्सून पश्चिम मध्य आणि बंगालच्या खाडीकडे सरकत आहे. याचा परिणाम काही राज्यांच्या वातावरणात होणार असून १० जूनपासून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचे सत्र १३ जूनपर्यंत सुरू राहिल. यासह पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच दिल्लीच्या काही भागात बुधवारी आणि गुरुवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. मंगळवारी दिल्ली तापमान ४० अंश सेल्सिअस होते. तर महाराष्ट्रातील कोकणात गेल्या २४ तासांममध्ये कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस झाला.
रत्नागिरी येथे ४९ मिलीमीटर, सिंधुदुर्गमधील मालवण येथे ५६ सावंतवाडी ३७, वैभववाडी ३०, वेंगुर्ला येथे ४४ मिलीमटीर आणि कोल्हापूरमधील गगनबावडा येथे ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट होत आहे. आज कोकणातील अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरू शकतो. तर विदर्भ, मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणीही पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र, वगळता उर्वरित ठिकाणी तापमान ३६ ते ३० अंशांपर्यत खाली घसरले आहे.
Share your comments