दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यामुळे विदर्भ तापण्यास सुरूवात झाली आहे. तेथे कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानाचा पारा आणखी वाढेल.
आज सोमवारी चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.मध्य महाराष्ट्र आणि परिसर व दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालचा उपसागराचा आग्नेय भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती असून बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात पुढील दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते अंदमानाच्या उत्तर भागात सरकेल.
हेही वाचा : यंदा जून- जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता; परदेशी हवामान विभागाचा अंदाज
हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भाग चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे.आज अरबी समुद्राच्या आग्नेय भागात त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. राज्यातील उन्हाच्या चटक्यात वाढ होऊन उकाडा वाढेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढू लागल्याने कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथे कमाल तापमानाचा पारा चाळीशी ओलांडली आहे. इतर भागांत कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा पारा वाढत आहे. खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले.
दरम्यान, मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने कमाल तापमानही वाढू लागला आहे. या भागात ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात सकाळपासून ऊन वाढत आहे. त्यामुळे अकोला, चंद्रपूर येथे ४० अंश सेल्सिअसच्या वर कमाल तापमान गेले.
Share your comments