Nashik News :
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होऊन आठ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. पण यातून मार्ग निघाला नाही. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मुंबईत कांदा व्यापारी, बाजार समिती प्रतिनिधी यांची बैठक बोलावली. यामुळे अजित पवार यांच्या बैठकीतून काही तोडगा निघतो का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे राज्याचे मंत्री कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर आणि संपावर मार्ग काढणार का? व्यापारी एक पाऊल आज येऊन बंद मागे घेणार का? सरकार त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी मागील बुधवारपासून कांदा लिलाव संप केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली आहे. पण व्यापारी त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याने कोणताचं मार्ग निघाला नाही.
दरम्यान, बाजार समिती बंद असल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चाळीत आणि घरात पडून आहे. तसंच नाशिक जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रमुख सहा ते सात मागण्या आहेत आणि त्यावर व्यापारी अजूनही ठाम आहेत. तसंच केंद्र सरकारशी या मागण्या अद्यापही ठाम आहेत. त्यामुळे राज्याचे मंत्री यावर काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा.
३) कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
४) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी.
५) देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.
Share your comments