दुष्काळी भागातील चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करा

Wednesday, 06 March 2019 08:13 AM


मुंबई:
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत, तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात. तसेच नादुरुस्त जुन्या पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत श्री. पाटील यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

दुष्काळ निवारणासाठी योजलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन श्री. पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे 2,700 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित निधी तातडीने वितरित करण्यात यावा. आतापर्यंत राज्यात 28 चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात चारा छावण्यांची मागणी आहे, तेथील छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. छावण्यातील जनावरांच्या औषधांसाठी पशुसंवर्धन विभागास निधी देण्याचा तसेच छावण्यांतील जनावरांच्या संख्येची मर्यादा 500 वरून 3 हजार करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा.

पाणीटंचाई असलेल्या गावातील दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना तसेच नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करुन सुरू कराव्यात. या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा स्थापन करावी. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्यासाठी 147 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. एप्रिल-मे महिन्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नवे स्त्रोत शोधून ठेवावेत. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला कामे देण्यात यावीत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

रोजगार हमी योजनेअंतर्गत 151 दुष्काळी तालुक्यांमध्ये 50 दिवस अतिरिक्त काम देण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. सध्या राज्यात रोहयोतील 42 हजार 770 कामे सुरू असून त्यावर 3 लाख 74 हजार 686 मजूर काम करत आहेत. 5 लाख 79 हजार 440 कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. कामाची मागणी होताच,तातडीने मागेल त्याला कामे देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुष्काळी भागातील सध्या शेती कर्जाची वसुली थांबविण्यात आली असून कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

chandrakant patil chara chavani fodder camps चंद्रकांत पाटील चारा छावण्या
English Summary: Immediately approve the proposal for fodder camps in drought-prone areas

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.