शेतकऱ्यांना जलदगतीने पीक कर्ज वाटप करावे

Thursday, 13 September 2018 03:20 PM


अकोला:
खरीप पीक कर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागून त्यांना योग्य माहिती द्यावी. बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याने कर्जमाफी व पीक कर्ज वितरणात अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत असून दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत पीक कर्ज जलदगतीने वाटप करावे, अशी सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप, कर्जमाफी व आरोग्य सेवेसंबंधी विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे व कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुनील मनचंदा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तरानिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खरीप पीक कर्ज वाटपातील संथगतीबाबत खा. धोत्रे व श्री. तिवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पीक कर्ज वाटपात उदासीनता दाखविणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा अहवाल संबंधित बँकेच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याच्या सूचना श्री. तिवारी यांनी यावेळी केली. 

संबंधित बातमी वाचण्यासाठी: राष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करावे

खासदार संजय धोत्रे म्हणाले की, गतवर्षी आलेल्या नैसर्गिक संकटामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने कर्जमाफी केली. त्यानंतर यंदा खरीप हंगामासाठी बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे अपेक्षित होते. मात्र बँकांनी अतिशय कमी प्रमाणात पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाबाबत काही बँकांच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सहकार्य करुन बँकांनी सुलभपणे व तातडीने पीक कर्ज वाटप करावे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र वाढण्यासाठी शक्यता नाकारता येत आहे नाही. दि. 1 ऑक्टोंबरपासून रब्बी पीक कर्ज वाटप सुरु होणार असून पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याची बँकांची जबाबदारी आहे. यामध्ये कुचराई होणार नाही, याची दक्षता सर्व बँक अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही खा. धोत्रे यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान यावेळी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.  जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. लोकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत नसतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी प्राधान्याने सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

crop loan akola farmer rabbi kishor tiwari पिक कर्ज अकोला शेतकरी रब्बी किशोर तिवारी bank बँक

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.