सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती एकीकडे प्रचंड आवक होत असल्याने संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे तर आवक जास्त होऊन देखील बाजार भाव चांगला टिकून असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंत बनत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या घडीला देशातील कांद्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार समितीत विक्रमी आवक नमूद करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी तब्बल 840 ट्रक कांद्याची आवक बाजारपेठेत झाली होती.
आवक जास्त झाली की बाजारभावात कमालीची घसरण होणे हे बाजारपेठेतील गणितच आहे. मात्र सोलापूर बाजार समितीत याउलट घडले दर्जेदार आवक झाली असताना देखील कांद्याचे दर वाढल्याचे समोर आले आहे. दरम्यान कृषी तज्ञांच्या मते, देशातील इतर बाजार समितीपेक्षा सोलापूर बाजार समितीत कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने आवक दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच बाजार समितीचा व्यवहार हा खूपच पारदर्शी आणि चौख असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर बाजार समितीत कांदा विक्री करणे पसंत करत आहेत. सोलापूर बाजार समितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासमवेतच राज्यातील कानाकोपऱ्यातून कांदा विक्रीसाठी आणला जात आहे. सोमवारी 840 ट्रक कांदा विक्रीसाठी आले असल्याने कांद्याची खरेदी उशिरापर्यंत बाजार समितीत बघायला मिळाली. सोमवारी बाजार समितीत कांद्याला किमान दर 1500 प्रति क्विंटल तर कमाल दर 2 हजार 609 रुपये प्रति क्विंटल एवढा प्राप्त झाला.
दर्जेदार आवक झाली असताना देखील समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याने बाजार समितीत विक्रीसाठी आलेले कांदा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र या वेळी बाजारपेठेत बघायला मिळाले. गेल्या आठवड्यात देखील किमान दर 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तर कमाल दर हा 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा प्राप्त झाला होता. सोमवारी विक्रमी आवक झाली असताना देखील मागच्या आठवड्यापेक्षा 300 रुपयांनी कांद्याचे दर वाढले असल्याचे समजते. बाजारपेठेत याच कारणामुळे विक्रमी आवक दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र आवक वाढली असल्यामुळे बाजारपेठेत माथाडी कामगारांची कमतरता भासू लागली आहे तसेच कामगारांना रोजच जास्तीचे काम असल्याने अनेक कामगार आजारी पडले आहेत.
त्यामुळे बाजारपेठेतील कांदा दुसऱ्या जागी घेऊन जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत परिणामी बाजार समितीला कांद्याचे लिलाव बंद पाडले लागताहेत. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते, सोलापूर बाजार समितीत विक्रमी आवक होत असताना देखील बाजार भाव समाधानकारक मिळत आहेत कारण की बाजार समितीचा व्यवहार हा खूपच पारदर्शी आणि चोख आहे. तसेच बाजारपेठेत येणारा कांदा हा अव्वल दर्जाचा असल्याने देखील बाजार भाव चांगला मिळत आहे तसेच दोन नंबरच्या कांद्याला देखील बाजारपेठेत चांगला बाजार भाव मिळताना दिसत आहे. एकंदरीत सोलापूर बाजार समितीच्या चोख व्यवहारामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी सोलापूर बाजारपेठेकडे मोर्चा वळविला आहे.
Share your comments