राज्यातील अनेक भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा वरती चढू लागला आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या चटक्यात आणखी वाढ होईल. उन्हाचा पारा वाढत असला तरी काही ठिकाणी थंडी अजूनही कायम आहे.
गुरुवारी सकाळपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १० अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दोन -तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थिती कायम आहे. त्यातच उत्तर भारतातील अनेक भागात हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यात कोरडे हवामान असल्याने ऊन वाढत आहे.
सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून दुपारी पारा ४० पर्यंत पोहोचत आहे. विदर्भातील अनेक भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर कमाल तापमानाची ३६ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर या भागात काही प्रमाणात किंचित थंडी असल्याने किमान तापमानात काहीशी घट असली तरी १४ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. कोकणात थंडी कमी झाली असून तापमानाचा पारा ४ अंश सेल्सिअस पर्यंत वाढला आहे. मुंबई येथे सर्वाधिक ३७.३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद गुरुवारी सकाळपर्यंत झाली आहे.तर किमान तापमानाचा पारा २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी -अधिक स्वरुपात आहे.या भागात किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही तापमान वाढू लागले आहे.
Share your comments