उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी होऊ लागल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भाच्या काही भागात झळा तीव्र लागल्याने कमाल तापमानाचा पारा ४० पर्यंत गेला आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात वाढ होत आहे.
दरम्यान शुक्रवारी ८ वाजेपर्यत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्रात असलेली चक्रीय स्थिती निवळून गेली आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाले असून सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ होत आहे. विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढ झाली आहे.
ब्रह्मपरी येथे ३९.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर येथे ३९.२, तर अकोला ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर किमान तापमानात काही अंशी चढउतार असून किमान तापमान १४ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठावड्यात थंडी काही प्रमाणात आहे. त्यामुळे किमान तापमानाची परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात १२.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. इतर भागात १५ अंश सेल्सिअसच्यावर आहे. कमाल तापमानातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परभणी येथे ३७ सेल्सिअसपर्यंत गेले आहे.
मध्य महाराष्ट्रतही थंडी आणि उन्हाच्या चटक्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सोलापूर येथे ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे. कोकणातही कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. सांताक्रूझ येथे ३८.१ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची, तर २०.६ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Share your comments