आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीत अतिमुसळधार तर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यामुले बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. काल मध्य महाराष्ट्र, विदर्भात, पावसाच्या सरी पडल्या. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून मेघालयातील इफाळपर्यंत पसरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३ जुलैला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
उद्या आणि परवा म्हणजेच ४ आणि ५ तारखेला मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार, तर मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात ६ जुलैला मुसळधार पाऊस होणार तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यात वादळासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सून देशात आल्यानंतरही दिल्लीमध्ये उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु हवामाना विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे दिल्लीवासीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी ठरली आहे. पुढील २४ तासात उप हिमालयीन, पश्चिम बंगाल, मेघालय, आणि आसामच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशासह काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Share your comments