1. बातम्या

मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आज तयार होत असून त्याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक, व कोकण किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

उद्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात आज पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. हे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील होणार असून राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढणआर आहे. बंगाल उपसगाराचा नैऋत्य भाग व उत्तर तमिळनाडू किनारपट्टी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागर पश्चिममध्य भाग व आंध्र प्रदेशचा उत्तर भाग व परिसर, दक्षिण ओडिसा या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

 


गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तर कोकण, गोव्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील आटपाडी १४०, माळशिरस १००, मिमी तसेच मराठवाड्यातील औसा १३० मिमी पावासाची नोंद झाली. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार तर रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २१ व २२ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मराठवाड्यात काल पावसाने थैमान घातले आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात जोरजदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात ओढे, नदीकाठच्या पिकांना पुराचा फटका बसला. यामुळे खरिपातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी व तुर पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड फुटले, तर कापूस गळून पडला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters