कांदा उत्पादक शेतकरी संकटात, राज्यमंत्री भारती पवार यांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
१. यंदा कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आता राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नाफेडमार्फत तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केलय. आता त्यांच्या या मागणीनंतर मंत्री पियूष योगल यांनी कांदा खरेदीचं आश्वासन दिलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळींब बागेला भेट दिली
२. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या २० एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींब बागेला भेट दिली. अहिरेकर यांनी त्यांच्या शेतामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाचे एकरी १० टन इतके दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतलं आहे. तसेच सुमारे ८० टक्के माल हा आखाती देशात आणि युरोपात निर्यात करतात. त्यांनी डाळिंबाची बाग अतिशय स्वच्छ ठेवली असून फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांवर आच्छादनाचा वापर केला आहे. अहिरेकर कुटुंब घेत असलेल्या कष्टाबद्दल शरद पवार यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता,ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी सूचना जारी
३. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये 6 ते 9 मे दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर याचदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी कामाची! 'मधमाशी मित्र पुरस्कारा'साठी इच्छुकांनी अर्ज करावेत; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचं आवाहन
४. मधमाशी पालन उद्योगात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना तसेच संस्थानास 'मधमाशी मित्र पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. मध उद्योगाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तसेच मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मधमाशी मित्र पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून देण्याची विनंती जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत आवश्यक असणारी माहिती व विहित नमुन्यात भरून दयावयाचा अर्जाचा नमुना मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी तो उपलब्ध करून घ्यावा. त्यामधील सर्व माहिती व फॉर्म भरून मंडळाच्या जिल्हा कार्यालयात 8 मे 2023 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने केले आले आहे. मधमाशी मित्र पुरस्कार 20 मे 2023 रोजी प्रदान केले जाणार आहेत.
जालना जिल्ह्यात 'हर घर नर्सरी' उपक्रम राबविला जाणार, नागरिकांनी सहभागी होण्याचं जिल्ह्याधिकारांचं आवाहन
५. आता बातमी जालना जिल्ह्यातून
जालना जिल्ह्यात हर घर नर्सरी या उपक्रमाची बरीच चर्चा होताना दिसतीये. या जिल्ह्यात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता व्हावी, या उद्देशाने हर घर नर्सरी हा उपक्रम राबविण्यात येतोय. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने किमान ५० रोपे तयार करावयाची आहेत.
यात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. हर घर नर्सरी या उपक्रमाद्वारे प्रत्येक कुटुंबाने ५० रोपे तयार केल्यास पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची स्थानिक पातळीवर उपलब्धता होतील.
अधिक बातम्या:
बातमी कामाची! 'मधमाशी मित्र पुरस्कारा'साठी इच्छुकांनी अर्ज करावेत; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचं आवाहन
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, शिंदे -फडणवीस सरकारवर केला गंभीर आरोप
Share your comments