Onion Mumbai News :
राज्य सरकारने मार्च महिन्यात जाहीर केलेले कांदा अनुदानाबाबत आज (दि.६) रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात कांद्याचे दर घसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दराअभावी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारने मार्च महिन्यात जाहीर केलेल्या अनुदानाचा पहिला हप्ता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत वितरीत केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रति क्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून तीन लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींच सानुग्रह अनुदान वितरित करण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात अतिशय कवडीमोल दरामध्ये शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला गेला. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली होती व हा प्रश्न विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील गाजला होता. त्यामुळे सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के रक्कमेचा लाभ
राज्यातील जालना, वाशिम तसेच अकोला, यवतमाळ, नागपूर, रायगड, सातारा, सांगली, ठाणे, अमरावती, बुलढाणा, नागपूर, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच राज्यातील धुळे, कोल्हापूर तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, नासिक आणि अहमदनगर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात विभागून देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची अनुदानाचे रक्कम हे दहा हजार पेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यांमध्ये दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Share your comments