द्राक्ष उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या द्राक्ष उत्पादकांची कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा ज्याप्रमाणे द्राक्षाच्या विक्रमी उत्पादनामुळे द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखला जातो अगदी त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातही द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. सध्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सद्या द्राक्षांना मिळत असलेला दर खूपच कवडीमोल आहे आणि यातून उत्पादन खर्च देखील काढणे मुश्किल होऊन बसणार आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र 37 रुपये प्रति किलो पर्यंत द्राक्षाला दर प्राप्त होत आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने द्राक्षाच्या दरात घसरण होत आहे. जिल्ह्यात द्राक्षला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे. द्राक्षांच्या दरात घसरण होण्यामागे तज्ञांनी अनेक कारणे सांगितली, त्यापैकी एक म्हणजे वाढती थंडी. यंदा थंडी थोडी उशिरा सुरू झाली मात्र ती दीर्घ काळ राहिल्यामुळे द्राक्षांना उठाव प्राप्त झाला नसल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले. तसेच ऐन हंगामाच्या वेळी देशात ओमायक्रोनचा प्रसार वेगाने होत असल्याने देखील द्राक्षाच्या उठावात बाधा निर्माण होत असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी कोरोनाच्या या नव्या वैरिएन्टचे कारण पुढे करून द्राक्षाला मागणी नाही असे म्हणत अगदी कवडीमोल दरात द्राक्षाची खरेदी करत आहेत.
व्यापाऱ्यांच्या या युक्तिवादामुळे द्राक्षाचे दर पाडण्यासाठी द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी षड्यंत्र उभे करत असल्याचा आरोप द्राक्ष उत्पादक शेतकरी यावेळी करीत आहेत. द्राक्षाचे दर कमी ठेवण्यासाठी द्राक्षे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एकजुटीने या षड्यंत्राची उभारणी केली असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. दोन दिवसापूर्वी 34 रुपये किलोने विक्री होणारे द्राक्ष सध्या 37 रुपये किलोने विक्री होत आहे. सध्या प्राप्त होत असलेला दर दोन दिवसापूर्वी असलेल्या दरापेक्षा थोडा अधिक जरी असला तरी या दरात द्राक्ष विक्री करणे परवडत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र तज्ञांनी दोन दिवसात झालेली ही वाढ सकारात्मक बाब असून येत्या काही दिवसात द्राक्षाच्या दरात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.
तज्ञांच्या मते, राज्यात थंडीची लाट आता ओसरत चालली आहे आणि उन्हाचे चटके देखील आता भासू लागले आहेत त्यामुळे उन्हात जसजशी वाढ होईल तसतशी द्राक्षाची खपत वाढेल द्राक्षाची खपत होताच बाजारपेठेत द्राक्षांची मागणी लक्षणीय वधारेल आणि परिणामी द्राक्षाच्या बाजार भावात मोठी वाढ होऊ शकते.
Share your comments