सध्या राज्यात कडाक्याच्या थंडीने सर्वत्र त्राहिमाम् माजवला आहे, यामुळे फळबाग पिकांसमवेत रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम घडून येत आहे. या कडाक्याच्या थंडीचा सर्वात जास्त फटका द्राक्ष बागांना बसत असल्याचे सांगितले जात आहे, द्राक्ष पंढरी म्हणून विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीचा कहर नजरेस पडत असून जिल्ह्यात पारा हा 5.5 अंश ते 4.6 अंश यादरम्यान नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या निचांकी तापमानामुळे जिल्ह्यात विशेषता निफाड तालुक्यात दिवसभर गारवा सदृश्य परिस्थिती कायम असल्याचे बघायला मिळत आहे.
उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यातील पारा कमालीचा खाली आल्याचे सांगितले जात आहे, यामुळे काढणीसाठी आलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसत असून तालुक्यातील द्राक्ष हार्वेस्टिंग साठी मोठ्या अडचणींना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते जर आगामी काही दिवस जिल्ह्यात याचप्रमाणे गारवा कायम राहिला तर द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे द्राक्ष मण्यांमध्येसाखर उत्तरण्यास विलंब देखील होऊ शकतो. निफाड तालुक्यात सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांची लागवड नजरेस पडते, या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर असलेल्या द्राक्षबागांना या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे द्राक्षाच्या दर्जा खालावण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे, तालुक्यातील द्राक्ष बागायतदार वाढलेल्या थंडीचा सामना करण्यासाठी द्राक्ष बागांना उब देण्यास शेकोटी पेटविताना व पाणी भरताना नजरेस पडत आहेत. तसेच द्राक्ष बागायतदारांच्या मते, तापमानात घट झाली असल्याने द्राक्षाची फुगवण थांबली असून साखर उतरण्यासाठी मोठी अडचण होत आहे आणि यामुळे उत्पादनात देखील घट होण्याचा धोका कायम बनलेला आहे.
ज्या द्राक्षबागा परिपक्व झालेल्या आहेत त्या द्राक्षबागांवर द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. या उभ्या झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी द्राक्ष बागायतदार एकमेकांना सहाय्य करताना नजरेस पडत आहेत, द्राक्ष बागायतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्य द्राक्ष बागायतदारांना मोलाचे मार्गदर्शन देऊन आपल्या द्राक्षबागा वाचवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. सध्या जिल्ह्यात अनेक भागात द्राक्ष हार्वेस्टिंग सुरु आहे, निफाड तालुक्यातही द्राक्ष हार्वेस्टिंग साठी बागायतदारांचे लगबग नजरेस पडत आहे, मात्र पूर्ण जिल्हा थंडीमुळे गारठला असल्याने द्राक्ष हार्वेस्टिंग साठी नाना प्रकारचे अडथळे येत आहेत आणि म्हणूनच द्राक्ष बागायतदार पुरता हतबल झाल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. जिल्ह्यात या वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे, या कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण थांबली असून, द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया मंदावली आहे याशिवाय द्राक्षवेलींचे पेशींचे कार्य देखील प्रभावित होऊन त्यामध्ये संथ गती आली आहे.
मागील दोन वर्षापासून द्राक्ष बागायतदार सलग कोरोना नामक महाभयंकर आजारांमुळे नाना प्रकारच्या समस्यांना तोंड देत उपाययोजना करीत कसेबसे उत्पन्न प्राप्त करीत आहेत. बागायतदारांच्या मते गेल्या अनेक वर्षापासून सुलतानी आणि आसमानी या दोन्ही संकटांचा सामना करत कसाबसा उदरनिर्वाह भागवत असताना या थंडीच्या कडाक्याने बागायतदार पूर्ण हतबल झाला आहे.
Share your comments