1. बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

कोल्हापूर: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे, लक्ष्मीवाडी, तारदाळ आणि माले या 5 गावांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली तसेच टंचाईबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर तारदाळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

KJ Staff
KJ Staff


कोल्हापूर:
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे, लक्ष्मीवाडी, तारदाळ आणि माले या 5 गावांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली तसेच टंचाईबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर तारदाळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून शासन त्यांना सर्व ती मदत करण्यात सक्रीय राहील अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पिकांच्या उत्पादनातील घटीची शासनस्तरावर निश्चित दखल घेतली जाईल त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील मात्र मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजनेची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला जाईल. गावातील पाणीपुरवठा योजनांचा दर महिन्याला यंत्रणांनी आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याबरोबरच दिर्घकालीन उपाययोजनांचेही नियोजन करा अशी सूचनाही त्यांनी केली.

दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 व यासंदर्भातील शासन निर्णयानुसार दुष्काळ परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे त्यानुसार ट्रिगर-2 लागू झालेल्या 172 तालुक्यांमध्ये क्षेत्रीय स्तरावर ग्राऊंड ट्रुथींगची कार्यवाही शासनाने हाती घेतली आहे. सन 2018 च्या खरीप हंगामात सप्टेंबर 2018 अखेर करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार राज्यातील 172 तालुक्यात ट्रिगर-2 लागू झालेला आहे. या तालुक्यातील 10 टक्के गावे रँडम पद्धतीने निवडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पावसाअभावी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून या तालुक्यातील प्रत्येकी 5 गावामध्ये मंत्रीमंडळातील सदस्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन शासनास वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील 5 गावांना आज भेट देऊन तेथील टंचाई परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाचही गावात पावसाने दांडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. परिणामी पीक उत्पादनात 25 ते 30 टक्क्यापर्यंत घट अपेक्षित आहे. या सर्व परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल यंत्रणेमार्फत घेतला जाईल असेही ते म्हणाले.

टंचाईग्रस्त गावातील पिकांची महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन सर्व्हे करावा, अशी सूचना करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन महिन्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, भुईमूग, ज्वारी अशा पिकांच्या उत्पादनात होणारी घट याची वस्तुनिष्ठ माहिती कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घेऊन अहवाल तयार करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

संभाव्य काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना दिली. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सद्यस्थितीत टंचाई जाणवत नसली तरी मार्चनंतर पिण्याची पाण्याची टंचाई जाणवेल हे गृहीत धरून गावागावात पाण्याचे स्त्रोत शोधून स्त्रोत बळकटीकरणाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनतेला पिण्याचे पाणी आणि जनावरांना पाणी उपलब्ध करून देण्यास शासन बांधिल असल्याचेही ते म्हणाले.

गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा योजनांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे स्पष्ट करत महसूलमंत्री म्हणाले, संभाव्य काळात पाण्याचा तुटवडा पडणार नाही याची यंत्रणांनी काळजी घ्यावी. पाणी पुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करावी, दरमहा पाणीपुरवठा योजनांचा तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टंचाईग्रस्त गावांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची तसेच पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या उपाययोजनांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण दौऱ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पी. डी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

English Summary: Governments stand in support for Drought area Farmers Published on: 14 October 2018, 05:33 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters