मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्ष उषाताई शिंदे, कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन सोना, कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक व सदस्य आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात चांगल्या विचाराचे लोक असले पाहिजे तरच सहकार टिकेल. कापूस उत्पादक पणन महासंघाची आतापर्यंतची वाटचाल चांगली आहे. राज्यात महासंघाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, त्या जागांचा योग्य तो वापर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. महासंघाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व सहकारमंत्री यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
Share your comments