धानाला पाचशे रुपये बोनस देणार

Monday, 25 February 2019 08:36 AM


भंडारा:
भंडारा-गोंदिया हा प्रामुख्याने धान उत्पादन करणारा जिल्हा आहे. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून द्यावा ही शेतकऱ्यांची मागणी होती. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे आयोजित विविध विकास कामाच्या भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. एक हजार कोटी रुपये खर्च करून भंडारा गोंदिया राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केली.

महाराष्ट्र बदलत आहे, विदर्भ बदलत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,विदर्भाच्या इतिहासात अभुतपूर्व असा निधी आपल्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिला. साडेचार वर्षात 50 हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे काम सुरू आहे. सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. गोसेखुर्द प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार असून येत्या दीड वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाला निधी दिल्यामुळे आता या प्रकल्पातून 50 हजार हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या साडेचार वर्षात  शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात 50 हजार कोटी रूपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शासनाने शेतकऱ्यांकडून विविध शेतमालाची 8,500 कोटी रुपयांची खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा गोंदिया तलावांचा सुद्धा जिल्हा आहे. तलावांची लीज कमी करण्याची मागणी येथील मासेमारी संस्थेची होती. 500 हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावासाठी आता लीज आकारली जाणार नाही. 500 ते 1,000 हेक्टरसाठी सहाशे तर 1,000 हेक्टरवरील तलावासाठी 900 रुपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थानाच देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

लाखांदूर ब्रम्हपुरी रस्त्यावर पूल कम बंधारा कामाचे भूमीपूजन करण्यात आले असून या रस्त्यामुळे 24 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. बंधाऱ्यामुळे शंभर गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्याचे दळणवळण सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा येथे बायो एव्हीएशन फ्युल हब निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेनॉलची निर्मिती होऊन इंधनाला पर्याय मिळेल व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरुणांच्या हाताला काम मिळेल असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

dhan Rice bonus Devendra Fadnavis Nitin Gadkari Bhandara भंडारा धान बोनस देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी गोसेखुर्द gosekhurd इथेनॉल ethanol

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.