
onion
राज्यात कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यातुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल ते 2100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव मिळत होता. मात्र कांद्याच्या बाजारभावात आता थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. कांद्याच्या बाजारभावात अल्पशी का होईना झालेली बढत सकारात्मक असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आनंदी असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
9 तारखेला कांद्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून विख्यात असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला 2711 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव प्राप्त झाला. तसेच नाशिक जिल्ह्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देखील कांद्याला समाधान कारक बाजार भाव मिळाला. पिंपळगाव बाजारपेठेत 9 तारखेला 2678 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव प्राप्त झाला. जिल्ह्यात कांद्याला सर्वात जास्त बाजार भाव सिन्नर तालुक्यातील दोडी उपबाजार समितीत नमूद करण्यात आला, या उपबाजारात कांद्याला 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर प्राप्त झाला. या उपबाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या विक्रमी बाजार भावामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी प्रसन्न असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. मित्रांनो, सध्या जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगामातील लाल कांदा काढणी सुरू आहे व लाल कांदा विक्रीसाठी शेतकर्यांची लगबग देखील शिखरावर आहे.
खरीप हंगामात झालेल्या वातावरणातील अमुलाग्र बदलामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाला मोठा फटका बसला. आधी अतिवृष्टी व कांदा काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी मुळे खरीप हंगामातील लाल कांदा बऱ्याच अंशी सडला होता यामुळे उत्पादनात मोठी घट नमूद करण्यात आली होती. खरीप हंगामात निसर्गाच्या या अवकृपेमुळे कांद्याचा दर्जा खालावला गेला असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे बाजारपेठेत चांगल्या दर्जाचा कांदा एवढा बघायला मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच सध्या चांगल्या दर्जाच्या कांद्याला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे समजत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, वर्षानुवर्षे कांद्याचा उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा या नगदी पिकावर महागड्या औषधांची किटकनाशकांची, फवारणी करणे अपरिहार्य झाले असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच कांद्याच्या बियाण्यात, खतांमध्ये, याशिवाय पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुक खर्चात झालेली वाढ यामुळे कांद्याचे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वजा जाता पदरी चार पैसे पाडण्यासाठी किमान सध्या मिळत असलेला बाजार भाव कायम राहणे गरजेचे आहे. दरम्यान, सध्या मिळत असलेला कांद्याचा दर समाधानकारक असल्याचे जिल्ह्यातील प्रगतिशील कांदा उत्पादक शेतकर्यांचे म्हणणे आहे.
Share your comments