1. बातम्या

नारायणगावमध्ये ग्लोबल फार्मर्स भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन

KJ Staff
KJ Staff


नारायणगाव:
येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, सेवादाते यासह शेती संबंधीत प्रत्येकाला प्रगतीच्या अगणित सुवर्णसंधी खुल्या करण्यासाठी सलग 4 थ्या वर्षी ग्लोबल फार्मर्स या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन येत्या 9 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या 80 एकर प्रक्षेत्रावर केले आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल बनविणारे पिक प्रात्यक्षिकावर आधारित असलेले भारतातील एकमेव कृषी प्रदर्शन आहे.

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल बनविणारे पिक प्रात्यक्षिकावर आधारित असलेले भारतातील एकमेव कृषी प्रदर्शन आहे. मुंबई-पुणे-नगर-नाशिक या सुवर्ण चौकोनाचा केंद्रबिंदू आणि राज्याच्या भाजीपाला उत्पादनाचे कोठार असलेले नारायणगाव कृषी पंढरी समजली जाते आणि याच ठिकाणी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येते. या कृषी प्रदर्शनाचा मुख्य गाभा पिक प्रात्यक्षिके आणि शेतकरी-शास्रज्ञ परिसंवाद असून सोबतीला जागतिक दर्जाच्या नव कृषी तंत्रज्ञानाने सजलेले महाराष्ट्रातील अजोड कृषी प्रदर्शन आहे अशी माहिती ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी दिली.

ग्लोबल फार्मर्स या कृषी प्रदर्शनात विविध 52 पिके आणि त्यावर 100 हुन अधिक प्रात्यक्षिके, 200 हून अधिक कंपन्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादने, खास शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव दि. 10 जानेवारीला आयोजित करण्यात आलेले जातिवंत दुधाळ जनावरांचे पशु प्रदर्शन, त्यातील उच्च गुणवत्तेच्या विविध जातींच्या गाई व म्हशी तसेच शेळ्या, कोंबड्या, तांदुळ महोत्सव, महिला बचत गटांचे स्वतंत्र दालन, शेती व घरगुती उपयोगाच्या विविध वस्तु खरेदी करणयासाठी संधी आणि आवर्जून आस्वाद घ्यावी अशी खास खाद्यसंस्कृतीचाही समावेश करण्यात आला आहे.

पिक प्रात्यक्षिकांमध्ये टोमॅटो, कोबी, वांगी, मिरची आदी भाजीपाला पिके, आंबा, चिक्कू, बोर, पेरु आदी फळपिके, रंगीबेरंगी शेवंतीचे डेमो प्लॉट, फुलशेती, शेडनेट पॉलीहाऊसची संरक्षित शेती, विविध प्रकारच्या पिकपद्धती, ऊस, हरभरा, मका, चारा पिकांचे विविध सुधारीत, संकरित रोगप्रतिकारक वाण व समस्या सोडविणारे अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान पाहण्याची संधी, यांत्रिकीकरणात कुदळ खुरप्यापासून दुग्धप्रक्रिया व डाल मिलपर्यंतची विविध प्रकारची अभिनव यंत्रसामग्री, सुक्ष्म सिंचन एटोमायझेशन, जैविक निविष्ठा निर्मिती, प्रदर्शनात खते, औषधे, बी-बियाणे, यांत्रिकी कंपन्या व संशोधन संस्थांचे नवतंत्रज्ञान आजमावून पाहण्याची संधी, पिक परिसंवादांमध्ये जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांमार्फत आपल्या शेतीला ग्लोबल बनविणारे ज्ञान तंत्रज्ञान समजून घेण्याची, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, शास्रज्ञ व तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी. सोबतच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे.

आपल्या शेतीला व शेतीसंबंधीत प्रत्येकाला समृद्ध होण्याची अनोखी संधी या कृषी प्रदर्शनात शेतकर्यांना पहिला मिळणार आहे. अत्याधुनिक कृषी ज्ञान तंत्रज्ञान आदान प्रदानाचे तुमचे आमचे हक्काचे हे भव्य कृषी प्रदर्शन असून येत्या 9 ते 12 जानेवारी दरम्यान, दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7, नारायणगाव येथे, कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य प्रक्षेत्रावर खुले राहणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters