1. बातम्या

कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा

KJ Staff
KJ Staff


अमरावती:
 खारपाणपट्ट्यासह अनेक गावांचा कायापालट करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने आणला आहे. ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाच्या कायापालटाच्या या संधीचे सोने करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. शासन व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने अभियंता भवनात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, ही योजना अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाची आहे. खारपाणपट्ट्यासह 532 गावांचा कायापालट त्यातून होणार आहे. योजनेच्या माध्यमातून आपल्या गावासाठी भरीव योगदान देण्याची संधी ग्रामपंचायत व गावाला मिळाली आहे. त्यासाठी योगदान द्यावे. शेतीला जोड म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन असा पूरक व्यवसाय आवश्यक आहे. कृषी सहाय्यक यांनी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. योजनेत औषधी वनस्पती उत्पादनाचा समावेशाबाबत प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

पूर्वी पावसाची संततधार, झड अनुभवायला मिळायची. निसर्ग समृद्ध होता. आता वातावरण बदलत आहे. या बदलाशी जुळवून घेत समृद्ध ग्रामविकास घडविण्याची क्षमता या योजनेत आहे, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले की, योजनेत ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका आहे. सरपंच समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. गावाचे सूक्ष्म नियोजन करून चांगला आराखडा तयार करावा.

मध्य महाराष्ट्र हा वातावरणातील बदलाला संवेदनशील झाला आहे. त्यामुळे या योजनेत वातावरणातील बदलाला अनुकूल पीकपद्धती आणण्याचा व रुजविण्याचा प्रयत्न आहे. ग्राम कृषी संजीवनी समित्यांनी त्यासाठी योगदान द्यावे, असे श्री. नागरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 14 तालुक्यातील, तसेच खारपान पट्ट्यातील एकूण 532 गावे
योजनेत विविध वैयक्तिक लाभासाठी 11 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त आहेत, असे श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यशाळेत विविध गावांतून कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters