कोरोना व लॉकडाउनमुळे विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, यावेळी मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
“अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहोचवण्याचे काम केले. घरी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली. कोरोनाचा संकट इतक मोठे आहे की संपूर्ण जग हादरले आहे. पण, भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारताने करोनाचे संक्रमण प्रभावीपणे रोखले आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केले तितके काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झाले असते, प्रचंड कौतुक झाले असते. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो,” असे मोदी म्हणाले.
लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना चकाकी आली आता गावासाठी करावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
दरम्यान केंद्र सरकारने मजुरांसाठी रोजगार योजना सुरू केली असून यासाठी सरकारने ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लॉकडाउन लागू केल्यानंतर विविध राज्यात काम करणारे लाखो मजूर आपापल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर या मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणाऱ्या कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Share your comments