1. बातम्या

फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? : विखे - पाटील

KJ Staff
KJ Staff

शिर्डी : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होऊ शकणार नाही, अशी भावना शेतक-यांमध्‍ये निर्माण होत आहे. यामुळे ही  योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. तसेच योजनेतील निकष बदलण्यासंदर्भात पत्रात विनंती केली आहे.  योजनेपासुन परावृत्‍त होत असलेल्‍या  शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन सुधारित निकष जाहीर करावेत अशी मागणीही त्‍यांनी पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

राज्‍य सरकारने यावर्षी पुर्नरचीत हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली आहे. मात्र योजनेतील निकष पाहीले तर सदरची विमा योजना ही शेतक-यांच्‍या नव्‍हे तर कंपन्‍यांचे हीत जोपासणारी असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. फळपीक नुकसान संरक्षण कालावधीत भरपाई प्राप्‍त होण्‍यासाठी निश्चित केलेले प्रमाणके (ट्रीगर) हे वास्‍तव हवामान परिस्थितीच्‍या विपरीत आहेत. पुर्वी या योजनेसाठी पावसाचा निकष दोन दिवसांसाठी होता, शिवाय पावसाचा खंड हे प्रमाणक होते. शासनाने यावर्षी या योजनेसाठी लागू केलेल्‍या निकषात जास्‍त पावसाचे निश्चित केलेले प्रमाणकच योजनेच्‍या लाभासाठी अडचणीचे ठरणार असल्‍याकडे आ.विखे पाटील यांनी  मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 सर्वसाधारणपणे कमी पावसाच्‍या व कोरडवाहू हवामान असलेल्‍या भागातील शेतकरीच प्रामुख्‍याने फळपीकांची लागवड करत असतो. वित्‍तीय संस्‍थाकडून कर्ज घेवून या फळपी‍कांची जोपासना केली जात असल्‍याने, दरवर्षी कर्जदार शेतक-यांना फळपीक विमा योजनेतील सहभाग सक्‍तीचा केला जातो. यावर्षी मात्र कर्जदार व बिगरकर्जदार शेतक-यांचा सहभाग ऐच्छिक ठेवण्‍यात आला आहे. सदर बाब‍ शेतक-यांबरोबरच बॅंकांनासुध्‍दा कर्जवसुलीसाठी अडचणीची ठरेल. फळपीकांच्‍या भरपाईसाठी निश्चित केलेले प्रमाणके स्‍थानिक हवामानाच्‍या विपरीत असून, विमा योजनेचा मूळ हेतूच या नव्‍या निकषांमुळे संपुष्‍टात आलेला आहे. चालू वर्षीच्‍या प्रमाणकांमुळे शेतक-यांचा या योजनेतील सहभाग कमी होण्‍याची भिती असून योजनेत सहभाग घेतलेल्‍या शेतक-यांनासुध्‍दा तुटपुंज्‍या भरपाईवरच समाधान मानावे लागणार आहे. यामुळे फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी असा प्रश्‍न आ.विखे पाटील यांनी पत्रातून उपस्थित केला.

कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमिवर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कोरोनाचे महासंकट अद्यापही दुर झालेले नाही, निसर्गाच्‍या लहरीपणामुळे फळपीकांची जोखीमही वाढली आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता पुर्नरचीत हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्‍ये निश्चित केलेल्‍या प्रमाणकांचा फेरवीचार करुन सुधारित निकष पुन्‍हा जाहीर करावेत अशी मागणी आ.विखे पाटील यांनी राज्‍य सरकारकडे केली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters