1. बातम्या

बांबू लागवडीपासून विक्रीपर्यंत, सर्वकाही एकाच छताखाली; कोल्हापुरात साकारला फोरम

KJ Staff
KJ Staff


पारंपरिक शेती सोडून शेतकरी वेगळा विचार करू लागले आहेत. एखाद्या ठिकाणी पडीक जमीन असेल अथवा डोंगराळ भागातील जमिनीत फारसे कष्ट न घेता दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी बांबू शेतीचाही विचार होऊ लागला आहे. अशा शेतकऱ्यांपासून उत्पादकांपर्यंत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम कोल्हापूर बांबू फोरमच्या माध्यमातून साकारला आहे.

आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड करू इच्छिणारे शेतकरी त्याची माहिती मिळविण्यासाठी धडपडतात. मात्र,  त्यांना एकाच ठिकाणी माहिती मिळत नाही. शेतीशी संबंधित या व्यवसायातील तज्ज्ञ आहेत. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छितात, मात्र त्यांना व्यासपीठ नाही. शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्याचे ठिकाण नाही. तर बांबूपासून विविध प्रॉडक्ट तयार करणारे कारागिर,  नर्सरी व्यावसायिक, बांबू सप्लायर या सर्वांना एकत्र तोडणारा फोरम तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून बांबूपासून तयार होणारे सर्व प्रॉडक्टही एकाच छताखाली पहायला मिळतील. 


उपलब्ध माहितीनुसार, भारतात बांबूखालील क्षेत्र १३.९६ दशलक्ष हेक्टर आहे. देशात जवळपास १३६ प्रजातींचे बांबू आढळतात. यामध्ये देशी १२५ प्रजाती आहेत. तर विदेशी ११ प्रजातींचा यात समावेश आहे. बांबूपासून मिळणारे राष्ट्रीय उत्पन्न १४.६ दशलक्ष मे. टन आहे. महाराष्ट्राप्रमाणे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात व्यावसायिक पद्धतीने बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचाही कल वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः ३०० एकर परिसरात बांबू लागवड करण्यात आली आहे. त्याचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. दहा जातींचे बांबूची रोपे सध्या उपलब्ध आहेत.

 


बांबूसा बल्कोवा ही उद्योगात वापरल्या जाणाऱ्या बांबूची रोपे अकरा वर्षांपूर्वी सन २००९ मध्ये लावण्यात आली. त्यापासून २०१५ पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. एक एकर क्षेत्रापासून साधारणतः ५० टन म्हणजे २५०० ते ३००० बांबूचे उत्पन्न मिळते. यापासून शेतकऱ्याला साधारणतः दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. बांबोसा टुल्डा ही उदबत्ती तयार करण्यासह द्राक्षबागेसाठी वापरल्या जाणाऱ्या काठ्यांसाठीच्या बांबूची जात, ब्रँडिसी, व्हल्गॅरीस, माणवेल, काटेकळक आदी प्रकारची रोपे येथे मिळतात. कमीत कमी एक एकर ते जास्तीत जास्त ६५ एकर क्षेत्रामध्ये बांबूची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे अशी माहिती कोल्हापूर बांबू फोरमचे समन्वयक अरुण वांद्रे यांनी दिली.

बांबू विषयातील एक्स्पर्ट असलेले अरुण वांद्रे हे फोरमचे समन्वयक आहेत. त्यांच्यासह अनंतकुमार जाजल, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रातील आशपाक मकानदार हे सुद्धा फोरमचे समन्वयक म्हणून काम पाहतात. बांबूपासून कारागीर फर्निचरसह विविध प्रकारचे विणकाम करून वस्तू तयार करतात. या वस्तू एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. याशिवाय जर शेतकऱ्यांना बांबू लागवडीविषयी माहिती हवी असेल तर त्यांना आठवड्यातून एखाद्या वेळी फोरमच्या माध्यमातून ट्रेनिंग दिले जाणार आहे. यासंदर्भात समन्वयक अरुण वांद्रे म्हणाले, व्यावसायिकदृष्ट्या वापरासाठी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने शिफारस केलेल्या जाती येथे उपलब्ध आहेत. त्यांची लागवड करण्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंतची माहिती येथे मिळेल. कोल्हापूर परिसरातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे आपला कल दर्शविला आहे. त्यांना एकत्र जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters